शांतता कायम राखण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने त्रिपुरामधील स्थानिक निवडणूक स्थगित करण्यास मंगळवारी नकार दिला आहे. त्रिपुरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी झालेल्या हिंसेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून प्रचार मंगळवारी 4.30 वाजता समाप्त होईल. तर मतदान 28 नोव्हेंबर तर मतमोजणी 4 डिसेंबरला होणार आहे. निवडणूक स्थगित करणे हा अखेरचा पर्याय असतो असे न्यायालयाने म्हटले आहे.
निवडणूक स्थगित करण्यापूर्वी तृणमूल काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आलेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शांततेत आणि योग्य पद्धतीने होतील हे सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देण्याचा आमचा विचार आहे. त्रिपुराचे पोलीस महासंचालक आणि गृह सचिवांनी राज्यात स्वतंत्र आणि निष्पक्ष नगरपालिका निवडणूक होईल यासाठीच्या तयारीबद्दल माहिती द्यावी. राज्यात शांतता आणि सुरक्षेसाठी पोलिसांसह अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्याचा विचार करावा अशा सूचना न्यायालयाने केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुठल्या आमदाराने प्रक्षोभक विधान केल्याचा आरोप तृणमूलने केला होता. याप्रकरणी राज्य सरकारने भूमिका मांडावी असा निर्देश न्यायालयाने दिला आहे.









