उत्तम दर्जाच्या बियाणांपासून शेतकरी वंचित : तातडीने उपलब्ध करण्याची मागणी
प्रतिनिधी
बेळगाव
पशुसंगोपन खात्याच्यावतीने दरवषी शेतकऱयांना रब्बी हंगामासाठी बि-बियाणांचे वाटप केले जाते. मात्र यंदा बि-बियाणे देण्याकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱयांतून नाराजी व्यक्त होत आहे. खरीप हंगामासाठी देखील बि-बियाणांचे वाटप करण्यात येते मात्र खरीप हंगामासाठी बि-बियाणे देण्यात आली नाहीत. त्यामुळे शेतकरी खासगी दुकानातून बि-बियाणे खरेदी करत आहेत.
मागील अनेक वर्षांपासून शेतकऱयांचा आर्थिक कणा सक्षम करण्यासाठी खात्याच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. शेतकऱयांसमोर चारा संकट निर्माण होऊ नये, यासाठी खात्यामार्फत चांगल्या प्रतीचे बि-बियाणे शेतकऱयांना उपलब्ध करून दिले जाते. मात्र यंदा बि-बियाणे देण्याकडे अद्याप खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. ग्रामीण भागातील जनावरांना उत्तम प्रतीचे वैरण मिळावे या उद्देशाने सुरू केलेल्या उपक्रमाकडे कानाडोळा झाल्याचे दिसून येत आहे. पशुपालकांच्या जनावरांना चांगल्या दर्जाचा चारा मिळावा यासाठी शेतकऱयांना 6 किलो मका व 5 किलो ज्वारी मोफत पुरविली जात होती.
तालुक्यात बेळगाव, हिरेबागेवाडी, सांबरा, उचगाव, अनगोळ, के. के. कोप्प, हुदली, कडोली, संतिबस्तवाड, येळ्ळूर, आंबेवाडी, काकती, सुळेभावी, महांतेशनगर, वडगाव, गजपती, हलगा, निलजी, नंदीहळ्ळी, किणये आदी भागात असलेल्या पशू वैद्यकीय दवाखान्यांतून ही बियाणे उपलब्ध करून दिली जात होती. त्यामुळे जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा मिळत होता.
त्याबरोबरच उत्पादनातही वाढ होत होती. त्यामुळे पशुसंगोपन खात्याने तातडीने बि-बियाणे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे.
दुर्लक्ष…
- शेतकऱयांतून नाराजी व्यक्त
- शेतकऱयांकडून खासगी दुकानातून बि-बियाणे खरेदी
- शेतकऱयांना 6 किलो मका व 5 किलो ज्वारी मोफत पुरविली जात होती









