राज्यात केवळ 8 हजार उमेदवार उत्तीर्ण : 2 लाख बी. एड., डी. एड. धारकांनी दिली होती टीईटी
प्रतिनिधी / बेळगाव
शिक्षक नियुक्तीसाठी सत्वपरीक्षा असणाऱया टीईटीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून राज्यातील 1 लाख 92 हजार भावी शिक्षक सदर परीक्षेत अपात्र ठरले आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी विलंबाने का होईना 4 ऑक्टोबर रोजी पार पडली. सदर परीक्षेसाठी राज्यातील 2 लाख बी.एड., डी. एड. धारकांनी टीईटी दिली होती. सदर परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून राज्यातून केवळ 8 हजार उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामुळे शिक्षक नियुक्तीची पहिली पायरी असणाऱया टीईटीच्या सत्वपरीक्षेत भावी शिक्षक अपात्र ठरले आहेत.
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातून 10 हजार 213 विद्यार्थी टीईटेला सामोरे गेले होते. राज्यातील ही संख्या 2 लाख होती. त्यातून केवळ 8 हजार उमेदवार पात्र ठरले असून अपात्र उमेदवारांची संख्या अधिक आहे. जिल्हय़ातून पात्र उमेदवारांची संख्या देखील कमी आहे. टीईटी पात्र ठरलेले उमेदवार सीईटीला सामोरे जाणार असून सीईटी कधी होणार याबाबतचे चित्र स्पष्ट नसल्याचे मत शिक्षण विभागातर्फे व्यक्त करण्यात आले आहे.
डी.एड, बी.एड. धारक उमेदवारांची संख्या वाढत आहे. त्यातुलनेत शिक्षक नियुक्ती प्रक्रिया मात्र संथगतीने होत आहे. यामुळे त्यातच टीईटी, सीईटी आणि यानंतर शिक्षक नियुक्ती या दिव्य प्रक्रियेतून शिक्षक भरती प्रक्रिया पार पडत असल्याने अपात्रधारकांची संख्या अधिक आहे. यामुळे टीईटीच्या माध्यमातून आपले नशीब आजमविण्यासाठी परीक्षार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. यामुळे टीईटी देणाऱयांची संख्या लाखाच्या घरात तर पात्रधारकांची संख्या हजारात असे चित्र दिसून येत आहे.
याबाबत शिक्षणाधिकारी एस. पॅटी यांनी टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का घसरला असून पदवी आणि टीईटी यामध्ये असणारे अंतर अधिक असल्याने उमेदवारांना टीईटी कठीण जाते. परिणामी निकालात घसरण होत असून राज्याच्या तुलनेत जिल्हय़ाचा निकालदेखील कमी असल्याचे मत व्यक्त केले.
अस्पष्ट…
- बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातून 10 हजार 213 विद्यार्थी
- सीईटी कधी होणार याबाबतचे चित्र अस्पष्ट
- शिक्षक नियुक्ती प्रक्रियाही संथगतीने









