इचलकरंजी / प्रतिनिधी
शहरात दुचाकीस्वाराने एका अल्पवयीन युवतीचा पाठलाग करून तिच्याशी भर रस्त्यात अश्लील वर्तन केले. या घटनेची माहिती पिडितेने नातेवाईकांना दिली. त्यानंतर नातेवाईकांनी पीडितेसह त्वरित पोलीसात धाव घेतली. पण पोलिसांनी हद्दीचा मुद्दा उपस्थित करीत तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. हा सर्व प्रकार शहरातील हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. झाल्या प्रकरणाची तक्रार नोंद का करीत नाही? यावरून पोलिसांना चांगले धारेवर धरले. तसेच रात्री उशिरापर्यंत पीडितेसह तिचे नातेवाईक आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी पोलीस ठाणे आवारात तळ ठोकून होते.
पीडित अल्पवयीन युवती गुरुवारी होणाऱ्या तुलसी विवाह समारंभानिमित्ताने मिठाई आणण्यासाठी आपल्या नातेवाईकाच्या स्वीट मार्टमध्ये गेली होती. तेथून ती पीडिता घराकडे येत असताना एका दुचाकीस्वाराने तिचा पाठलाग केला. हा पाठलागचा प्रकार पिडितेच्या लक्षात येताच तिने शहरातील मुख्य रस्त्यावरून भीतीच्या छायेत घराकडे जाऊ लागली. याच वेळी संबंधित दुचाकीस्वाराने शहरातील गजबजलेल्या छत्रपती संभाजी चौकानजीक भर रस्त्यात तिच्याशी अश्लील वर्तन केले. त्यानंतर पिडितेने आरडाओरडा करताच संशयित दुचाकीस्वाराने धूम स्टाईलने पलायन केले. या प्रकरणानंतर पीडितेसह तिचे नातेवाईक तक्रार दाखल करण्यासाठी शिवाजी नगर पोलीसात धाव घेतली. पोलिसांनी घडला प्रकार आमच्या हद्दीत येत नाही, हा मुद्दा उपस्थित करीत तक्रार घेण्यास टाळाटाळ करू लागले. त्यामुळे नातेवाईकानी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधून त्यांना झाल्या घटनेची माहिती दिली. याची वरीष्ठ पोलिसांनी दखल घेऊन शिवाजी नगर पोलिसांना या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याचा सक्त आदेश दिला. त्यावरून बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
तसेच या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव व शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाला संबंधित दुचाकीस्वाराचा शोध घेऊन अटक करण्याबाबतचा आदेश दिला. त्यावरून पोलिसांची दोन पथके संशयिताचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत. पोलिसांनी दुचाकीच्या नंबरवरून संबंधित संशयिताचा तपास सुरू केला आहे. तपासामध्ये अश्लील वर्तन करणाऱ्या युवकाचे नाव रात्री उशिरा निष्पन्न झाले असून त्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. पण पोलिसांची चाहूल लागताच त्याने पलायन केल्याने तो पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता.









