क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत कळंगूट असोसिएशनने विजय नोंदविला. जीएफएच्या धुळेर फुटबॉल मैदानावर खेळविलेल्या लढतीत कळंगूट असोसिएशनने कुडचडेच्या गार्डीयन एँजल स्पोर्ट्स क्लबचा 3-1 असा पराभव केला.
सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला नायजेल सिल्वेराने गोल करून कळंगूट असोसिएशनला आघाडीवर नेले. त्यानंतर 67व्या मिनिटाला डॉम्निक फर्नांडिसने दुसरा तर 80व्या मिनिटाला आत्माराम जाधवने तिसरा गोल केला. त्यानंतर पेनल्टीवर गिल्बर्ट ओलिव्हेराने गार्डीयन एँजल स्पोर्ट्स क्लबचा एकमेव गोल केला. या सामन्यातील सामनावीर पुरस्कार उदय लिंगुडकरच्या हस्ते कळंगूट असोसिएशनच्या मॉयसेस डिसाला प्राप्त झाला.









