प्रतिनिधी / पणजी
मांगोरहिल वास्को येथील कोरोनाच्या फैलावामुळे पूर्ण वास्को लॉकडाऊन करण्याची गरज नाही. मात्र मांगोरहिल येथे येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर या भागातील लोकांच्या फिरण्यावर नियंत्रण घालण्यात आले आहे. काल मांगोरहिल संदर्भात मुख्यमंत्र्यानी वॉररुम मध्ये बैठक घेतल्यानंतर त्यांनी वरील माहिती दिली.
मांगोरहिल येथील 200 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यातील 40 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. आज दुसऱया सर्कलमधील 300 जणांची चाचणी केली. त्यातून जास्त पॉझिटिव्ह मिळण्याची शक्यता वाटत नाही. पण सध्या मांगोरहिल येथील लोकांना बाहेर पडायला दिले जात नाही. या भागातील तिन्ही प्रवेशद्वारे बंद केली आहेत. कोणत्याही व्यक्तीला आत प्रवेश दिला जात नाही किंवा बाहेर पडायला दिले जात नाही. दूध, भाजी, कडधान्य पैसे घेऊन त्यांना वितरित करण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मांगोरहिलमधील सर्वांची चाचणी करणार
जे लोक पॉझिटिव्ह सापडले त्यांचा संपर्क कुठे आला, ते कुठे काम करीत होते, याची माहिती घेतली जात आहे. त्यांना क्वारंटाईन करणे व त्यांची चाचणी करणे हे सुरु आहे. त्यामुळे तूर्त तरी पूर्ण वास्को लॉकडाऊन करण्याची गरज नाही. मात्र मुरगाव तालुक्यातून मांगोरहिलला जोडणाऱया सर्व मार्गावरील वाहतूक कमी करण्याची सूचना केली आहे. पोलिसांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. सरकार मांगोरहिलबाबत गंभीर आहे. सर्व लोकांची चाचणी केली जाणार आहे.
मांगोरहिलमध्ये ‘कम्युनिटी ट्रान्समिशन’ नाही
मुरगाव भागातील अन्य काही भागांचे सर्वेक्षण करण्याची सूचना केली आहे. जे संशयास्पद दिसतात त्यांची चाचणी केली जाणार आहे. मांगोरहिल वगळता अन्य भागात रुग्ण नाहीत. 75 चाचण्या नकारात्मक आल्या. पण ज्यांना वाटत असेल त्यांनी चाचणी करून घ्यावी. मांगोरहिल येथील जी व्यक्ती आंध्रप्रदेशला गेली होती त्याला लागण झाली असावी व त्याच्याकडून मुलांना गेली असावी. त्यामुळे तो स्थानिक फैलाव आहे. पण ते कम्युनिटी ट्रान्समिशन नाही, असेही ते म्हणाले.
एनआयओत जे आले ते बेंगलोरहून आले. त्यांची चाचणी केली. नंतर मुलांची पॉझिटिव्ह येताच त्यांना पुन्हा आणले. दुबईहून आलेल्या लोकांनी गोंधळ घातला. त्यातील दोन पॉझिटिव्ह आले. ते घरी गेले असते तर तिथे घरी लागण झाली असती. आता विमानातून येणाऱया सर्वांची चाचणी करावी लागणार आहे. आता अजूनही विदेशी विमाने येणार आहेत. दुबईहून येणाऱया सर्वांना चाचणी सक्तीची व 7 दिवसांचे क्वारंटाईन सक्तीचे आहे, असे ते म्हणाले.









