रात्री उशिरा आणखी रूग्ण दाखल होणार
मांगोरहिल – वास्को भागात कोरोनाचा संसर्ग झाल्याने कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. काल बुधवारी दिवसभरात मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये एकूण 40 रूग्ण दाखल झाल्याची माहिती हॉस्पिटलातील डॉक्टरांनी दिली. रात्रीपर्यंत आणखी रूग्ण दाखल होणार असल्याचे संकेत आहेत. गोव्यात आतापर्यंत सापडलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या शंभरीच्या पलिकडे पोचली आहे.
मांगोरहिल भागात काल दिवसभरात एकूण 40 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याची वार्ता संपूर्ण गोव्यात वाऱयासारखी पसरली व सर्वांनाच धक्का बसला. मारूती मंदिर परिसरात कोरोनाचा फैलाव अधिक प्रमाणात झाला असून त्या भागातूनच हे कोरोनाचे रूग्ण अधिक प्रमाणात आढळून आले आहे. सुरूवातीला आढळून आलेला मासे विक्रेता याच भागातील असून त्याची पूर्ण फॅमिली कोविड हॉस्पिटलात उपचार घेत आहे. काल त्याचे दोन शेजारी पॉझिटिव्ह आढळून आले होते. नंतर रात्री उशिरा एका मागोमाग एक करत कोविड हॉस्पिटलमध्ये रूग्ण येऊ लागले.
सद्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱया सर्वाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. काल उशिरा एक वयस्क व्यक्ती दाखल झाली असून तिला ‘क्रिटिकल केस’ म्हणून हाताळले जाणार आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये पुढील काही दिवसात खाटांची कमतरता भासू शकते म्हणून ईएसआय हॉस्पिटलची अतिरिक्त जागा व खाटांची तयारी सुरू करण्यात आली आहे.
गोव्याने ओलांडले शतक
गोव्यात आतापर्यंत सापडलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या शंभरीच्या पलिकडे पोचली असून परिस्थिती देखील नियंत्रणाच्या बाहेर जाऊ लागल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. कोविड हॉस्पिटलातील डॉक्टरांनी देखील सद्याच्या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुरवातीला गोव्यात एक-दोन असे रूग्ण आढळून आले व नंतर राजधानी एक्सप्रेसमधून एकाच दिवशी 11 कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर ही संख्या हळूहळू वाढत गेली. काल बुधवारी दिवसभरात 38 रूग्ण दाखल झाले ही विक्रमी संख्या ठरली. बुधवारी रात्री आणखी रूग्ण दाखल होणार असल्याचे संकेतही कोविड हॉस्पिटलला मिळाले आहेत.
मांगोरहिल भागातून दाखल झालेले काहीजण विविध आस्थापनात काम करणारे असल्याने कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर त्याचे नांतेवाईक मडगावच्या मोती डोंगर तसेच गोव्याच्या इतर भागात असून या भागात प्रवास केलेला असल्याने त्या सर्वांची तपासणी करणे आत्ता अत्यंत महत्वाचे बनले आहे.
कोविड हॉस्पिटलात शवागार सुरू
दरम्यान, ईएसआय हॉस्पिटलचे कोविड-19 हॉस्पिटलात रूपांतर करण्यात आल्याने सुरवातीला केवळ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार केले जात होते. या ठिकाणी रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आतापर्यंत शंभर टक्के राहिले आहे. मात्र, संभाव्य परिस्थिती ओळखून या ठिकाणी आता शवागर देखील सुरू करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर हल्ली काही जणांना श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊन मृत्यू आला होता. त्याची शवचिकित्सा मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात करण्यात आली. आतापर्यंत 9 जणांची शवचिकित्सा करण्यात आली. परंतु, त्यात एकही कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याचे आढळून आले आहे.









