प्रतिनिधी/ बेळगाव
पावसाळय़ात घाटमाथ्यावरील रेल्वे मार्गावरील कोसळणाऱया दरडी आणि माती धसल्याने प्रवाशांना फटका बसू नये यासाठी नैऋत्य रेल्वेने लॉकडाऊनच्या काळात दुरूस्तीचे काम पूर्ण केले आहे. हुबळी विभागातील कॅसलरॉक व कुलेम घाटातील रेल्वेमार्गाच्या शेजारी स्लीपर्स बसविण्यात आले आहेत. रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अरविंद मलकारे यांनी या कामाची पाहणी केली.
लॉकडाऊनच्या काळात स्पेशल रेल्वे वगळता इतर रेल्वे वाहतूक बंद होती. याकाळात नैऋत्य रेल्वेने दुरूस्तीचे काम हाती घेतले होते. रेल्वे मार्गाशेजारील माती घसरू नये साठी 2 हजार सिमेंटचे स्लिपर्स बसविण्यात आले आहेत. मिरज ते लोंढा व लोंढा ते वास्को दी गामा या दरम्यान असणाऱया 8 ब्रिजची स्वच्छता करण्यात आली. पावसाचे पाणी एकाच जागी साचून राहू नये साठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच धोकादायक ठिकाणी 1 हजार वाळूची पोती लावण्यात आली आहेत. तसेच काही ठिकाणी पेव्हर्स ब्लॉकही बसविण्यात आले आहेत.
बेळगाव ते वास्को हा मार्ग घाटातून जातो. पावसाळय़ाच्या दिवसांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्याने अनेकवेळा माती घसरून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे कोणतीही दुर्घटना होवू नये यासाठी रेल्वे विभागाने त्यापूर्वीच खबरदारी घेण्यासाठी सुरूवात केली आहे.









