प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेमधून कला मंदिरच्या जागेत बहुमजली क्यापारी संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. कामाचे कंत्राट देण्यात आले असून संकुलाची उभारणी करण्यासाठी खोदाई करून काम सुरू करण्यात आले होते. मात्र लॉकडाऊनमुळे काम रखडले होते. पण सध्या काही कामगार रूजू झाल्याने व्यापारी संकुलाच्या तळघराच्या भिंतीचे बांधकाम सुरू आहे.
कला मंदिरच्या जागेत बहुमजली व्यापारी संकुलाची उभारणी करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत 43 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. कला मंदिर सभागृहाची दुरवस्था झाली असल्याने व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव महापालिका सभागृहात मांडण्यात आला होता. याबाबत बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला होता. पण निधीअभावी हा प्रस्ताव मार्गी लागला नव्हता. मात्र हा प्रस्ताव साकारण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली असल्याने हा प्रकल्प उभारण्याचे काम मार्गी लागले आहे.
क्यापारी गाळे, सभागृह, दुचाकी व चारचाकी वाहनांकरिता पार्पिंग सुविधा तसेच चित्रपटगृह अशा विविध तरतुदी या प्रकल्पात करण्यात आल्या आहेत. याठिकाणी खोदाईचे काम सुरू करण्यात आले होते. पण महापालिका प्रशासनाने कला मंदिर परिसरात असलेले गाळे, रहिवासी गाळे तसेच भाजी मंडईची जागा रिकामी करून दिली नसल्याने कामाला सुरुवात करण्यास विलंब झाला होता. तसेच काँग्रेस रोड रुंदीकरणातील विस्थापितांनी न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविली आहे. अशा विविध कारणांमुळे क्यापारी संकुलाच्या कामाला सुरुवात झाली नाही. पण माती परीक्षणाचे काम करण्यात येत असून याकरिता कला मंदिर आवारात खोदाई करण्यात आली होती. पण रितसर जागा हस्तांतर करून उपलब्ध असलेल्या जागेत काम सुरू करण्याचा आदेश तत्कालिन प्रशासक प्रादेशिक आयुक्त अंम्मलान बिस्वास यांनी दिला होता. त्यामुळे जागा हस्तांतर करून कामाला सुरुवात करण्यात आली होती. तसेच जानेवारी महिन्यात येथील भाजी मंडई आणि व्यापारी गाळय़ाची इमारत हटवून जागेचा ताबा कंत्राटदाराकडे देण्यात आला आहे. पण न्यायालयाने स्थगिती दिलेले गाळे अद्याप हटविण्यात आले नाहीत. मात्र अन्य इमारती हटवून जागा मोकळी करण्यात आली असून अलीकडेच मातीचे ढिगारे हटविण्यात आले आहेत. त्यामुळे या जागेतदेखील बहुमजली व्यापारी संकुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
सध्या व्यापारी संकुल इमारतीच्या पायाचे काम तसेच तळघराच्या भिंतीचे बांधकाम करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे काम थांबले होते. पण सध्या असलेल्या कामगारांकरवी सदर काम सुरू करण्यात आले आहे.









