पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या दोन वर्षांपासून लेंडी नाल्याची सफाई करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून होत होती. त्यासाठी नेहमीच पाठपुरावा केला. शेतकऱयांच्या या मागणीची दखल घेत पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी लेंडी नाल्याची पाहणी केली. यावेळी शेतकऱयांच्या म्हणण्यानुसार या नाल्याची खोदाई पूर्ण करा, अशी सूचना महापालिका आयुक्तांना त्यांनी केली आहे.
लेंडी नाल्याची रुंदी वाढवावी याचबरोबर खोदाई करावी, यासाठी शेतकरी संघटनेने नेहमीच पाठपुरावा केला. त्यामुळे महापालिकेने गेल्या काही दिवसांमध्ये या नाल्याची खोदाई केली आहे. राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या पूलाजवळचा गाळ देखील काढण्यात आला. मात्र मोठा हिताची जेसीबी आवश्यक असल्यामुळे तो गाळ तसाच ठेवण्यात आला. याबाबत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना मोठा हिताची जेसीबी आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावर पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी महापालिका आयुक्तांना तो जेसीबी उपलब्ध करुन त्याची खोदाई पूर्ण, असे सांगितले.
यापूर्वी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडे या नाल्याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यांनी तातडीने महापालिका अधिकाऱयांना सांगून त्याची खोदाई सुरु केली. मात्र अजूनही बऱयाच अंशी खोदाई करणे बाकी असून ती पुर्ण करावी, अशी मागणी शेतकऱयांनी यावेळी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी संपूर्ण खोदाई करा आणि हाच नाला नाही तर इतर सर्व नाले खोदाई करुन स्वच्छ करा, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग शेजारी जावून पालकमंत्र्यांनी या नाल्याची पाहणी केली. याचबरोबर कोनवाळ गल्ली येथेही या नाल्याची पाहणी केली. हा नाला स्वच्छ झाला तर शहराला महापूराचा फटका बसणार नाही, असे त्यांनी यावेळी अधिकाऱयांना सांगितले. कोणत्याही परिस्थितीत हा नाला पूर्ण स्वच्छ करा, असे सांगण्यात आले. यावेळी केंद्रिय राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी, आमदार अनिल बेनके, किरण जाधव, महापालिका आयुक्त जगदीश यांच्यासह इतर महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. याचबरोबर शेतकरीही मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पाठपुरावा करणाऱया शेतकऱयांनाच बाजुला सारण्याचा प्रयत्न
या नाल्याच्या खोदाईसाठी नारायण सावंत यांच्यासह इतर शेतकऱयांनी प्रयत्न केले. पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना माहिती देत असताना जाणूनबुजून त्यांना तेथून बाजुला करण्याचा केविलवाणा प्रयत्न काही जणांनी केला. यामुळे शेतकऱयांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ज्यांनी खोदाईसाठी पाठपुरावा केला त्यांनाच बोलायला न देणे म्हणजे एक प्रकारे हुकुमशाही करण्याचाच प्रयत्न केल्याचे दिसून आले. या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त होत होती.









