वृत्तसंस्था/ दुबई
विदेशमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दुबई 2020 एक्स्पोतील भारतीय दालनाचा दौरा केला आहे. भारत, संयुक्त अरब अमिरात, अमेरिका आणि इस्रायलकडून निर्माण करण्यात आलेल्या नव्या आघाडीला आता ‘पश्चिम आशियाई क्वाड’ म्हटले जात आहे. आगामी आठवडय़ात या गटाची बैठक होणार आहे. आमची पहिली बैठक एक महिन्यापूर्वी पार पडली होती, पण ती हायब्रिड बैठक होती. आगामी बैठक दुबईत होण्याची शक्यता असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
मागील क्वाड बैठकीदरम्यान व्यापार, हवामान आणि सागरी सुरक्षेसारखे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. दुबई एक्स्पो 2020 मध्ये पोहोचलेल्या जयशंकर यांनी स्लोवाकिया, सायप्रस आणि लक्झेम्बर्गच्या विदेश मंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यांनी आरोग्य सेवेसह प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा केली आहे.
दुबई एक्स्पोतील भारतीय दालनाला आतापर्यंत 3 लाख लोकांनी भेट दिलेली असून ही मोठी गोष्ट असल्याचे जयशंकर म्हणाले. दुबई एक्सपोमध्ये स्लावाकियाचे विदेशमंत्री इवान कोरकोन यांना भेटून आनंद झाला. विसेग्राड समुहासोबत स्वतःचे सहकार्य मजबूत होण्याबद्दल आशावादी असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.









