डेथ व्हॅलीतील अनोखा प्रकार
तुम एका निर्जन भागात फिरत आहात आणि अचानक एक हलणारा दगड तुम्हाला दिसला तर काय होईल याची कल्पना करा. ही कल्पना कुणालाही हादरवून टाकणारी आहे. पण अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात ही कल्पना सत्य सिद्ध होते. येथे एक ओसाड जमीन असून तेथे दगड एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी आपोआप सरकत असतात. कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅली नॅशनल पार्कमधील रेसट्रक फ्लाया या कोरडय़ा सरोवराबद्दल हा दावा करण्यात येतोय.

हे सरोवर 1.25 मैलापर्यंत फैलावलेले आहे. येथील दगड परस्परांपासून आपोआप सरकत असतात असा चकित करणारा दावा करण्यात येतो. यातील काही दगडांचे वजन 100 किलोग्रॅमपेक्षा अधिक असल्याने लोक तसेच वैज्ञानिकांना हे आश्चर्य वाटत आहे. डेथ व्हॅलीच्या दगडांमागील कारणे जाणून घेण्यासाठी जगभरातील वैज्ञानिकांच्या पथकांनी वेळोवेळी अनेकदा संशोधन केले आहे.
चुंबकीय भूमी
डेथ व्हॅलीमध्ये परग्रहवासीयांचा एक गुप्त तळ आहे, परग्रहवासीय आल्यावर हे दगड सरकत असल्याचे मागील शतकात मानले जात होते. यादरम्यान प्रसिद्ध एका वैज्ञानिक अहवालात वाऱयाच्या प्रवाहामुळे दगड स्थान बदलत असल्याचे म्हटले गेले होते. पण पुढील काळात क्षेत्रात संशोधन करणाऱया वैज्ञानिकांच्या एका समुहाने सरोवराखालील भूमी चुंबकीय असल्याने दगड सरकत असल्याचे म्हटले होते. तसेच दगडांमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्याचेही सांगण्यात आले होते.
रहस्य उलगडल्याचा दावा
वैज्ञानिकांच्या एका समुहाने 2014 मध्ये 200 किलोग्रॅमहून अधिक वजन असलेल्या दगडांची ओळख पटवत त्यांचे स्थान नोंदविले होते. काही वर्षांनी परतल्यावर दगडांनी किमान एक किलोमीटरचे अंतर कापल्याचे त्यांना आढळून आले होते. रिचर्ड डी नॉरिस आणि त्यांचे बंधू जेम्स नॉरिस यांनी स्वतःच्या संशोधनात डेथ व्हॅलीच्या दगडांमधील रहस्य उलगडल्याचा दावा केला आहे. दगड हिवाळय़ात अधिक सरकतात, हिवाळय़ात सरोवरातील पाणी गोठते आणि सकाळी उन्हामुळे बर्फाचे आच्छादन वितळू लागते आणि पाण्यावर तरंगू लागतात. जोरदार वाऱयामुळे बर्फाच्या आच्छादनाला वेग मिळतो आणि याचबरोबर दगड देखील हलतात असा दावा त्यांनी केला आहे.









