दिल्लीत द्वयींमध्ये 20 मिनिटे चर्चा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बुधवारी खलबते झाल्यानंतर राजकीय पातळीवर विविध प्रकारच्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दिल्लीत दोघांमध्ये सुमारे 20 मिनिटे चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये महाराष्ट्राच्या प्रश्नांवर चर्चा झाली आहे. मात्र, या बैठकीबाबत तातडीने कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या (माविआ) नेत्यांविरोधात केंद्रीय यंत्रणांकडून तपास अधिक तीव्र केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे. शरद पवार संसदेतील पंतप्रधानांच्या दालनात मोदींसोबत सुमारे 20 मिनिटे चर्चा करत होते. या भेटीमध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्तीची बाब पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. ते सरकारविरोधात बोलत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा दावाही पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी आणि त्यांच्या दोन सहकाऱयांची 11.15 कोटी रुपयांची मालमत्ता जमिनीच्या काही व्यवहारांशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीत जप्त केल्याच्या एका दिवसानंतर ही बैठक झाली.
विशेष म्हणजे, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने या भेटीबाबत उलटसुलट चर्चा आहेत. देशमुख यांना सीबीआयच्या पथकाने मध्य मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले होते.
विकासकामांबाबत भेट घेतली असावी ः अजित पवार
पवार-मोदी भेटीविषयी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विकासकामांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असावी, असे प्रसारमाध्यमांना सांगितले. तसेच याबाबत आपल्याला अधिक माहिती नसल्याचे सांगत सध्याच अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही, असे ते पुढे म्हणाले. मात्र देशाचे पंतप्रधान आणि कोणत्याही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विकासकामांसंदर्भात भेटू शकतात. संसदेच्या अधिवेशनात राज्यातील काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणे आवश्यक असल्याने चर्चा झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला.









