तूर्तास संप मागे : बससेवा सुरळीत मात्र, प्रवाशांची संख्या थंडावली : संप काळात परिवहन महामंडळाला तब्बल 11.5 कोटींचा फटका
प्रतिनिधी / बेळगाव
परिवहन मंडळाच्या कर्मचाऱयांनी तूर्तास संप मागे घेतल्याने बुधवारपासून बससेवा सुरळीत सुरू झाली आहे. शहरासह ग्रामीण भागातील विविध मार्गावर बस धावताना दिसत आहेत. मात्र वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळे सोमवार ते शुक्रवार नाईट कर्फ्यू आणि शनिवार व रविवार विकेंड कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. त्यामुळे बससेवा सुरळीत सुरू झाली असली तरी प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे परिवहन मंडळ कर्मचाऱयांच्या संपातून तूर्तास सुटले असले तरी कर्फ्यूमध्ये अडकले असल्याचे दिसून येत आहे.
सहावा वेतन लागू करावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी परिवहन कर्मचाऱयांनी तब्बल पंधरा दिवस संप पुकारला होता. दरम्यान, परिवहनची बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागला. स्थानिक बससह लांब पल्ल्यांच्या बसगाडय़ा जाग्यावर थांबून राहिल्याने संप काळात परिवहनला तब्बल 11.5 कोटींचा फटका बसला आहे. राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत होता. तर दुसरीकडे परिवहनच्या कर्मचाऱयांचा संपदेखील सुरू होता. दरम्यान उच्च न्यायालयाने संप तातडीने मागे घ्यावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार संप मागे घेण्यात आला आहे.
शुक्रवारी बेळगाव बसस्थानकातून वडगाव, सुळेभावी, होनगा, मजगाव, चंदगड, मुचंडी, अनगोळ, बी. के. कंग्राळी, काकती, उचगाव यासह इतर ग्रामीण भागात बस धावल्या. तसेच धारवाड, हुबळी, निपाणी, चिकोडी, हुक्केरी, संकेश्वर, कोल्हापूर, बेंगळूर आदी लांब पल्ल्यांसाठी देखील बस धावल्या. बससेवा सुरळीत सुरू झाली असली तरी वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कर्फ्यू व विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आल्याने प्रवाशांची वर्दळ थंडावली आहे. गुरुवारी दुपारी अचानक बाजारपेठेतील दुकाने बंद करण्यात आल्याने लॉकडाऊनवच्या भीतीने बाहेर पडणाऱया नागरिकांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे शुक्रवारी बसस्थानकाच्या आवारात प्रवाशांची वर्दळ कमी असलेली पहायला मिळाली.
आज बससेवा सुरू राहणार
वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे राज्यात शनिवारी व रविवारी विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मात्र शनिवारी सर्व प्रकारची बससेवा सुरळीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. शनिवारी ग्रामीण भागासह स्थानिक व लांब पल्ल्यांच्या बस प्रवाशांची संख्या लक्षात घेवून सुरू ठेवल्या जाणार आहेत.









