सीटीझन कौन्सिलची एडीजीपी भास्कर राव यांच्याकडे मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. या संसर्गाला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने तो रोखण्यासाठी बेळगावमध्ये बेंगळूर पॅटर्न राबवा, अशी मागणी सीटीझन कौन्सिलने अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) भास्कर राव यांच्याकडे केली आहे. शुक्रवारी त्यांची भेट घेऊन बेळगावच्या कोरोना नियंत्रणाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत बेंगळूरमध्ये मोठय़ा प्रमाणात संसर्ग झाला होता. या काळातही भास्कर राव यांनी बेंगळूर येथील कोरोना आटोक्मयात आणला होता. कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता केवळ कोरोना आटोक्मयात आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मोठी हानी टळली होती. त्यामुळे हाच पॅटर्न बेळगावमध्ये राबविणे गरजेचे असल्याची मागणी सीटीझन कौन्सिलने भास्कर राव यांच्याकडे केली.
बेळगावमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रशासन व पोलिसांनी उत्तम कार्य केल्यामुळेच कोरोनाचा संसर्ग आटोक्मयात आला. परंतु दुसऱया लाटेत लोकांच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. बेळगाव शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाने खरेदीसाठी भ्रमंती वाढली असून त्यावरही नियंत्रण आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी बोलताना भास्कर राव म्हणाले, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. अंमलबजावणी करताना कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सीटीझन कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर, सदस्य सेवंतीभाई शहा यांच्यासह इतर उपस्थित होते.









