वृत्तसंस्था/ लिमा (पेरू)
आयएसएसएफ कनिष्ठांच्या विश्व नेमबाजी स्पर्धेत भारताने पदक तक्त्यात आघाडीचे स्थान मिळविताना चार सुवर्ण आणि दोन रौप्य अशी एकूण सहा पदकांची कमाई केली. या स्पर्धेत भारताचा नेमबाज मनु भाकरची कामगिरी चमकदार झाली.
भारतीय नेमबाजांनी 10 मी. एअर पिस्तुल मिश्र, पुरूष आणि महिलांच्या सांघिक प्रकारामध्ये आपले वर्चस्व राखले. या स्पर्धेत दिवसअखेर भारताने एकूण सहा सुवर्ण, सहा रौप्य आणि दोन कास्य पदकांसह एकूण 14 पदकांची कमाई करत पदक तक्त्यात अमेरिकेला मागे टाकत अग्रस्थान मिळविले. या स्पर्धेमध्ये अमेरिकने पदक तक्त्यात दुसरे स्थान मिळविताना चार सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कास्यपदके पटकाविली.
भारताच्या मनु भाकरने या स्पर्धेत एकूण तीन सुवर्णपदक पटकाविली. 10 मी. पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारामध्ये मनु भाकरने सरबज्योत सिंगसमवेत सुवर्णपदक मिळविले. महिलांच्या सांघिक 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत मनु भाकर रिथम सागवान आणि शिखा नरवाल यांनी सुवर्णपदक मिळविताना बेलारूसचा 16-12 असा पराभव केला. पुरूषांच्या एअर पिस्तुल 10 मी. सांघिक नेमबाजीत नवीन, सरबज्योत सिंग आणि शिवा नरवाल यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून देताना बेलारूस संघाचा 16-14 असा पराभव केला. कनिष्ठांच्या पुरूष 10 मी. एअर रायफल सांघिक प्रकारात भारतीय नेमबाजांनी सुवर्णपदक मिळविले. महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल सांघिक प्रकारात भारतीय महिला नेमबाजांनी आपले वर्चस्व राखत सुवर्णपदक मिळविताना बेलारूसचा 569-568 अशा गुणांनी पराभव केला. या स्पर्धेत भारताच्या राजप्रित सिंगने एक सुवर्ण आणि रौप्यपदक पटकाविले.









