आमदार सुदिन ढवळीकर यांची मागणी
वार्ताहर/ मडकई
गोमंतकीय तरुणांना नोकरीची व्यवस्था करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दहा हजार नोकऱया देण्याची घोषणा केली आहे. नोकर भरतीला प्राधान्य देतानाच, कंत्राटी कामगारांचे थकलेले वेतन आधी चुकते करा. गेली आठ दहा वर्षे सरकारच्या विविध खात्यात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱया कामगारांना सरकारी सेवेत कायम करण्याची मागणी मगो नेते तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी दहा हजार नोकऱया देण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागतच करावे लागेल. सन 2017 च्या विधानसभा निवडणुकीनंतर नोकरभरती करण्याचे स्थगित केले होते. 30 नोव्हें.पासून या नोकऱया खुल्या करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कंत्राटदारांची बिले थकलेली असल्यामुळे निविदा काढूनही कंत्राटदार दुसरी कामे करण्यास तयार नाहीत. त्यांची बिले चुकती न केल्यामुळे राज्यातील कित्येक विकासकामे अडकून पडली आहेत. वेळेवर ही बिले फेडली नसल्याने आणि कामगारांचेही पगार वेळेत न दिल्याने कामगारवर्ग व कंत्राटदारामध्ये नैराश्येचे वातावरण आहे, असे सांगून कंत्राटदाराची बिले तातडीने चुकती करण्याची मागणी त्यांनी केली.
म्हादईच्या प्रश्नावर बोलताना ढवळीकर म्हणाले, म्हादईवर घाला घालण्यासाठी कर्नाटकने पद्धतशीरपणे डाव रचला आहे. गोव्यातील भाजपाचे सरकार हे कर्नाटक सरकारशी बांधील आहे. भाजपाने नेमलेले गोव्यातील नेते टी. रवी हे कर्नाटकाचेच आहेत तर काँग्रेसचा गोव्यात असलेला नेता गुंडुराव हाही कर्नाटकचाच आहे. केंद्रातही भाजपाचे सरकार असल्यामुळे एकापरीने कर्नाटकाने खेळलेली ही खेळी आहे. त्यासाठीच कर्नाटक सरकार गोव्याच्या माध्यमातून म्हादईवर घाला घालत आहे. काँग्रेस व भाजपाच्या जोखडातून म्हादईला मुक्त करण्यासाठी आता गोमंतकीयांनी एकत्र येण्याची गरज आहे. समस्त गोवेकरांनी मगो पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून म्हादईचा हा लढा लढण्यासाठी साहाय्य करावे, असे आवाहनही आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले.









