प्रतिनिधी/ पणजी
पूर्वीपासून मुलांना शिक्षण देणे म्हणजे चार भिंतीच्या शाळेत शिक्षण देणे एवढेच मर्यादित होते. परंतु कोरोना काळामुळे ही संकल्पना बदलली शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील मुले ई लर्निंग या संकल्पनेकडे वळली. कोरोनामुळे देशात झालेल्ला लॉकडाऊनात सर्व शैक्षणिक संस्थांनी ई लर्निंगचा पर्याय निवडला. यात कुजिरा बांबोळी येथील मुष्टिफंड आर्यन उच्च माध्यमिक विद्यालयही मागे राहिले नाही. कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून स्वतःची क्षमता समजण्याचे प्रोत्साहन मुष्टिफंडने दिले आणि अजूनही देत आहे.
मुलांना योग्यप्रकारे शिक्षण देऊन शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविण्याचा ध्यास घेतलेल्या आर्यन स्टडी सर्कलची गरूडझेप राज्याच्या शिक्षण क्षेत्राला समाधान देणारी आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये मागे राहणारा गोमंतकीय विद्यार्थी आर्यनमुळे राज्यपातळीवरच नव्हे तर राष्ट्रीयपातळीवर आपला ठसा उमटवित आहे. याशिवाय लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना स्वयंपरीक्षण करण्यासाठी वेळ दिला आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगभर पोहचून विद्यार्थ्यांना अनेक तज्ञांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी धडपड केली आणि आज आर्यन मुष्टिफंड संस्था कोरोनापुढे न डगमगता धैर्याने अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.
विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थाची कवाडे केली खुली
गोव्यातील सक्षम आणि गुणवत्तायुक्त विद्यार्थ्यांना अत्याधुनिक व दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करून त्यांच्यासमोरील क्षितिजांचा विस्तार तसेच देशविदेशातील अव्वल आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थाची दारे त्यांच्यासाठी खुली करून दिली आहेत. फक्त भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र या अभ्यासक्रमावर मर्यादित न राहता राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षांसाठीही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य सदर संस्था करत आहे. संस्थेच्या प्रखर शैक्षणिक रचनेमुळे भाविक शास्त्रज्ञ व संशोधक बनण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळते. सदर संस्थेची विशेषता म्हणजे इयत्ता अकरावी व बारावीचा अभ्यासक्रम हा एनसीईआरटीच्या संकल्पनेतून सुरू होतो. सुमारे 60 ते 70 टक्के अभ्यासक्रम हा वर्गातच पूर्ण केला जातो. त्यानंतर उर्वरित अभ्यासक्रम गृहपाठ या आधारे मेन्टरच्या मार्गदर्शनाखाली पूणं केला जातो.
ऑनलाईन पद्धतीने 80 टक्के अभ्यासक्रम पूर्ण
लॉकडाऊन काळात शैक्षणिक वर्षाला सुट्टी देण्यात आली नाही. ऑनलाईन पद्धतीने अकरावी व बारावीचे वर्ग सुरूच होते. लॉकडाऊनपूर्वी अकरावी व बारावीचा प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला होता. याशिवाय मागील वर्षी विद्यार्थ्यांना टॅबही देण्यात आले असल्याने लॉकडाऊन काळात ऑनलाईन क्लासेससाठी त्यांचा वापर करण्यात आला. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संपूर्ण जगभर विद्यार्थ्यांना पोहचण्याची संधी मिळाली. याशिवाय अनेक शास्त्रज्ञ, तज्ञांचे मार्गदर्शनही त्यांना लाभले. सध्या ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू असून सुमारे 80 टक्के अभ्यासक्रम पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आर्यन मुष्टिफंडचे व्यंकटेश प्रभुदेसाई यांनी दिली. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱया अभ्यासक्रमामुळे पालक समाधानी असून यापुढेही ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम किंवा वर्ग संस्थेने सुरूच ठेवावे अशी मागणी केली आहे.
एप्रिल महिन्यापासून अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले होते. त्यानंतर मे महिन्यांपासून ऑनलाईन क्लासेसला सुरूवात करण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्यांना ऑनलाईन कनेक्टीव्हीटी मिळते की नाही याची शहानिशा करून त्यानंतर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र या अभ्यासक्रमावर भर देण्यात आला. अशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने सर्व विषय हाताळण्यात आले.









