वार्ताहर / राजापूर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारी राजापूर शहरातील खडपेवाडी येथील ब्रिटीशांची वखार जीर्ण झाल्यानंतर जमिनदोस्त करण्यात आली. त्यानंतर या वखारीचे पुर्ननिर्माण व्हावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. अद्यापही या प्रस्तावाला चालना मिळालेली नाही. त्यामुळे या वखारीचे पुर्ननिर्माण केव्हा होणार ? असा सवाल शिवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
ब्रिटीशांच्या कालावधीत निर्माण झालेली राजापूरची वखार म्हणजे एकेकाळी राजापूरची शान होती. सुरूवातीपासूनच चालू-बंद असलेली ही वखार छत्रपती शिवाजी महाराजांनी येथून इंग्रजांचा बिमोड केल्यानंतर अल्पावधीतच बंद पडली. त्यानंतरही गेली अनेक वर्षे तिचे अस्तित्व दिसून येत होते. मात्र काळाच्या ओघात पुरातत्व विभागाचे याकडे झालेल्या दुर्लक्षतेमुळे ही वखार नामशेष झाली आहे. इंग्रजांनी बांधलेली ही वखार नेमकी कधी बांधली गेली हे सांगता येणे कठीण असले तरी 1649 च्या दरम्याने ती सुरू झाल्याचे सांगण्यात येते. मात्र ही वखार सुरू झाल्यापासून ती सातत्याने चालू-बंद अवस्थेत होती.
त्यावेळी राजापूर व्यापारी पेठ असल्याने इंग्रज, फ्रेंच, डच यांच्यातील सत्तासंघर्ष व शिवाजी महाराजांच्या स्वाऱ्या यामुळे कोकण किनारपट्टीवर सातत्याने अशांतता होती. सन 1661 मध्ये शिवाजी महाराजांच्या हल्ल्यानंतर ही वखार बंद पडल्याची नोंद आढळते. ही बंद पडलेली वखार पुन्हा 1668 मध्ये सुरू झाली. मात्र 1670 मध्ये पुन्हा एकदा शिवरायांच्या स्वारीमुळे बंद पडली होती. 1702 मध्ये ती पुन्हा सुरू झाली. त्यानंतर 1710 च्या सुमारास ती बंद पडल्याचा कयास इतिहास अभ्यासक व्यक्त करत आहेत.
या वखारीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाल्याने ही जीर्ण झाली त्यामुळे सन 2006 मध्ये ती जमीनदोस्त करण्यात आली. वास्तविक एक ऐतिहासिक ठेवा म्हणून या वास्तूचे जतन करणे गरजेचे होते. मात्र तसे न होता या वखारीला भूईसपाट करण्यात आले. राजापुरात एका कार्यकमासाठी आलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीही याबाबत जाहीर खंत व्यक्त केली होती. तेव्हापासून या जागेत शिवसृष्टी निर्माण करण्याची मागणी येथील शिवपेमींमधून करण्यात येत होती. तत्कालीन पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी या वखारीच्या जागेत जशीच्या तशी वखार उभारण्याची ग्वाही दिली होती. मात्र अद्यापही वखार पुर्ननिर्माणाच्या पस्तावाला चालना मिळालेली नाही.









