क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना एटीके मोहन बागान आणि मुंबई सिटी एफसी यांच्यात होईल. मंगळवारी फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात एटीके मोहन बागानने नॉर्थईस्ट युनायटेडचे कडवे आव्हान 2-1 असे मोडीत टाकले. पहिल्या टप्प्यातील 1-1 अशा बरोबरीनंतर या निर्णायक विजयासह एटीके मोहन बागानने 3-2 अशा ऍग्रीगेटवर बाजी मारली.
सामना संपण्यास नऊ मिनिटे बाकी असताना नॉर्थईस्टचा पोर्तुगाली स्ट्रायकर लुईस माशादोने पेनल्टीवर गोल करण्याची संधी गमविली. आता 13 मार्च रोजी फातोर्डा स्टेडियमवर आयएसएलच्या चषकावर नाव कोरण्यासाठी अंतिम लढत होणार आहे. एटीके मोहन बागानसाठी डॅव्हिड विलियम्स आणि सामनावीराचा पुरस्कार मिळविलेला मानवीर सिंगने तर नॉर्थईस्ट युनायटेडचा एकमेव गोल सुहैर वड्डाकेपिडीकाने केला.
भारतीय प्रशिक्षक खलीद जमिल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱया नॉर्थईस्टने झुंजार कामगिरी केली होती. पहिल्या लढतीत भरपाई वेळेत इद्रीसा सिला याने त्यांना बरोबरी साधून दिली होती. यावेळी मात्र आंतोनियो हबास यांच्या मार्गदर्शनाखाली एटीके मोहन बागानने सातत्याने चाली रचत नॉर्थईस्टवर दडपण ठेवले. पहिल्या दहा मिनिटांत एटीके मोहन बागानने आक्रमक खेळ करत चार वेळा नॉर्थईस्टचा बचाव भेदला. प्रथम पहिल्याच मिनिटाला डॅव्हिड विलियम्सचा गोल करण्याचा यत्न गोलबारवरून गेला. तिसऱया मिनिटाला रॉय कृष्णाने दिलेल्या पासवर झेवियर हर्नांडिझने मारलेली शूट गोलपोस्टला आदळली. त्यानंतर चौथ्या आणि दहाव्या मिनिटाला डॅव्हिड विलियम्सचे गोल करण्याचे यत्न थोडक्यात हुकले.
सामन्याच्या 38 व्या मिनिटाला एटीके मोहन बागानने गोल करून आघाडी घेतली. रॉय कृष्णाने दिलेल्या पासवर डॅव्हिड विलियम्सने नॉर्थईस्टचा गोलरक्षक सुभाषिश रॉयला भेदले आणि चेंडू जाळीत टोलविला. त्यानंतर 47 व्या मिनिटाला नॉर्थईस्टची गोल बाद करण्याची संधी गोलपोस्टला चेंडू आदळल्याने वाया गेली. यावेळी फॅडेरिको गॅलेगोने दिलेल्या पासवर सुहैरने हाणलेला फटका गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्यला स्पर्श करून गोलपोस्टला लागला.
त्यानंतर 62 व्या मिनिटाला एटीकेच्या रॉय कृष्णाचा गोल करण्याचा यत्न बचावपटू आशुतोष मेहताने गोलरेषेवरून बाहेर टाकला. सहा मिनिटांनंतर एटीकेने दुसरा गोल केला. रॉय कृष्णाच्या पासवर मानवीर सिंगने हा गोल केला. दोन गोलांच्या आघाडीनंतर नॉर्थईस्टच्या सुहैर वड्डाकेपिडीकाने गोल करून सामन्यात रंगत आणली. नॉर्थईस्टने या गोलनंतर खेळाचा वेग वाढवला आणि पेनल्टीही प्राप्त केली. एटीकेचा बचावपटू सुभाषिश बोसने इदीस सिलाला पाडल्याबद्दल मिळालेली पेनल्टी लुईस माशादोने फटका बाहेर मारून गमविली.









