प्रतिनिधी / पणजी
सावळे पिळर्ण येथील युवा कार्यकर्ते ऍड. आदित्य नाईक यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक तथा गोमंतक भंडारी समाजाच्या केंद्रीय समितीचे उपाध्यक्ष देवानंद अर्जून नाईक यांचे ते पूत्र आहेत. भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी त्यांना पक्षात रितसर प्रवेश देऊन त्यांचे अभिनंदन केले.
भाजपात प्रवेश केल्यानंतर आदित्य यांनी सांगितले की सामाजिक कार्य करण्याची आपल्या आवड असून त्यासाठी भाजप हा योग्य पक्ष असल्याचे आपणास वाटल्याने आपण भाजपात प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर जात असून जगामध्येही आपल्या देशाचा मानसन्मान मोदी यांच्यामुळे वाढला आहे. त्यांच्या नेतृत्वाखली देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोरोना महामारीच्या काळात आपल्या देशाने केलेल्या कामगिरीमुळे आपला देश आरोग्यक्षेत्रात अग्रेसर असल्याचे जगालाही दिसून आले. मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणाऱया सर्व कार्यकर्त्यांना योग्य संधी व सन्मान मिळत आहे. आपणासही भाजपमध्ये समाजकार्य करण्याची संधी मिळणार असल्याचा विश्वासही त्याने व्यक्त केला.
भाजपच्या मुख्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी भाजपामध्ये युवकांना काम करण्याच्या खूप संधी असून आदित्य यांनी भाजपात प्रवेश करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे, आपण त्यांचे अभिनंद करतो, असे तानावडे म्हणाले. भाजप युवा मोर्चा अध्यक्ष समीर मांद्रेकर व सरचिटणीस रोहन शिरोडकर उपस्थित होते.









