एसपी अजयकुमार बंसल यांची माहिती
प्रतिनिधी/ सातारा
वाई तालुक्यातील तडीपार आणि मोक्क्यातील प्रमुख आरोपी असलेला कुख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधवच्या सातारा एलसीबीच्या पथकाने प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा करुन पंजाब राज्यात भटिंडा येथे तो रहात असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ तसेच कारवाई पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कारगिरीबद्दल अजयकुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीचे जाहीरपणे अभिनंदन केले. या कारवाई पोलिसांनी अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (वय 24, रा. भुईंज ता. वाई), निखील शिवाजी मोरे (वय 24, रा. फुलेनगर भुईंज) व मयुर महादेव साळुखे (वय 35, रा. कालगाव ता. कराड) यांना अटक केली आहे.
भुईंज (ता.वाई) येथील कुख्यात गुंड आणि स्वयंघोषित भाई बंटी जाधव याने टोळीतील साथीदारांना हाताशी धरुन भुईंज येथील आसले पुलावर राहत असलेल्या ओंकार चव्हाण याचे अपहरण करुन त्याचा अमानूषपणे खून केला होता. खून केल्यानंतर पुरावा नष्ठ करण्यासाठी जाधव त्याच्या साथीदारांनी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास भुईंज येथीलच स्मशान भूमीत त्याचा मृतदेह जाळून टाकत कौर्याची परिसीमा पार केली होती. या गुन्हय़ात 18 आरोपी निष्पन्न झाले होते. त्यापैकी 13 आरोपींना अटक करुन त्यांच्यावर मोक्कांतर्गंत कारवाई करण्यात आलेली होती.
काही महिन्यांपूर्वी लॉकडाऊनच्या काळात वाई शहरात जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन करून तडीपार असताना देखील बंटी जाधव याने पोलिसांना गुंगारा देता होता. वाई शहरात चारचाकी वाहनातून आपल्या साथी दारासह प्रवेश करुन रविवार पेठ येथे टोळीच्या वर्चस्व वादातून लाठय़ा काठय़ा घेऊन दहशत माजवली. समोरच्या प्रतिस्पर्धीवर विना परवाना पिस्टलमधून गोळ्या झाडून प्रचंड दहशत माजवली होती. भुईंजमधील घटनेनंतर या टोळीची गंभीर दखल बंटी जाधव टोळीला मोक्का लावून पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी मोठा झटका दिला होता. मात्र, बंटी जाधव फरारी होता. अजयकुमार बंसल यांनी पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना बंटी जाधवला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
तेव्हापासूनच एलसीबीचे पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस नाईक शरद बेबले, प्रवीण फडतरे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन ससाणे, रोहित निकम हे महाराष्ट्र राज्यासह परराज्यात बंटी जाधवच्या मागावर होते. एलसीबीच्या तपास पथकाला बंटी हा नेपाळमध्ये असल्याची माहिती मिळाल्यावरुन ते नेपाळकडे रवाना होऊन पोहचले देखील पण बंटीला नेपाळ सिमेवरच असताना सातारा एलसीबीचे पथक आपल्या मागावर असल्याची माहिती मिळताच तो नेपाळला न जाता पंजाब राज्यात गेला. मात्र तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱयांनी त्याची पाठ सोडली नव्हती. अखेर दि. 7 रोजी पंजाब तेथेच एलसीबीच्या पथकाने झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या व बंटीसह त्याच्या दोन साथीदारांना देखील जेरबंद केले आहे.ख
चौकट
सलग दोन महिने अथक परिश्रम
मोक्कासारख्या गंभीर गुन्हय़ातील मुख्य आरोपी असलेल्या बंटीचा ठावठिकाणाची माहिती काढून त्याला ताब्यात घेण्यासाठी सलग दोन महिने स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक काम करत होते. त्यानंतर त्याचे लोकशेन मिळाल्यावर सलग पाच दिवस राजस्थान, हरियाना, पंजाब राज्यात अहोरात्र तपास करुन भटिंडा येथून बंटीसह दोन साथीदारांना ताब्यात घेवूनच हे पथक साताऱयात परतले.
तपास पथकाचे अभिनंदन
बंटी जाधवला ताब्यात घेणाऱया तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पोलीस नाईक शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, निलेश काटकर, गणेश कापरे, मुनीर मुल्ला, रोहित निकम, सचिन ससाणे, विशाल पवार, वैभव सावंत, अनिकेत जाधव, महेश पवार यांच्यासह पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांचे अजयकुमार बंसल यांनी अभिनंदन केले. तसेच या पथकाला तसेच गजा मारणेला जेरबंद करणाऱया मेढा पोलीस पथकाला रिवॉर्ड देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.








