बीकेयू डकौंदा-लक्खोवालकडून मिळाले नाही समर्थन ः एमएसपी समितीत नसणार राजेवाल अन् चढूनी
वृत्तसंस्था/ जालंधर
पंजाब विधानसभा निवडणूक लढवू पाहणाऱया शेतकरी नेत्यांना मोठा झटका बसला आहे. भारतीय किसान युनियन एकता (डकौंदा) आणि बीकेयू (लक्खावाल) यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. तसेच त्यांनी निवडणूक लढविणाऱया 22 शेतकरी संघटनांना समर्थन देण्यासही नकार दिला आहे. तर निवडणूक लढविण्यासाठी संघटन निर्माण करणारे बलबीर राजेवाल आणि गुरनाम चढूनी यांना एमएसपी विषयक समिती सामील केले जाणार नसल्याची माहिती राकेश टिकैत यांनी दिली आहे.
निवडणूक लढविणाऱया 22 शेतकरी संघटनांवरून संयुक्त किसान मोर्चा 15 जानेवारीच्या बैठकीत निर्णय घेणार आहे. हे शेतकरी नेते आता मोर्चाच्या हिस्सा नसतील. परंतु त्यांची युनियन अन्य प्रतिनिधींद्वारे आंदोलनात राहणार की नाही यावरही अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
समर्थनाचा दावा
दिल्ली सेमेवर आंदोलनात पंजाबच्या 32 शेतकरी संघटना सामील होत्या. यातील 22 शेतकरी संघटनंनी संयुक्त समाज मोर्चाची निर्मिती केली असून याच्या माध्यमातून पंजाब विधानसभेच्या 117 जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय किसान युनियन डकौंदा आणि लक्खोवाल समवेत 3 युनियन्सनी समर्थ दिल्याचा दावा या नेत्यांनी केला होता.
कुणालाच समर्थन नाही
भाकियू एकता डकौंदाचे प्रदेश उपाध्यक्ष गुरदीप सिंह रामपुरा यांनी आम्ही निवडणूक लढविणार नाही तसेच कुणालाच समर्थन देणार नसल्याचे म्हणत संघर्षाद्वारे मुद्दय़ांवर तोडगा काढत राहू असे म्हटले आहे. आमची युनियन निवडणूक लढविणार नाही तसेच कुणाला पाठिंबाही देणार नाही. शेतकऱयांच्या अनेक मागण्या अद्याप प्रलंबित असल्याने राजकीय लढाईमुळे यात अडथळा निर्माण होऊ शकतो असे उद्गार भाकियू लक्खोवालचे नेते अजमेर सिंह लक्खोवाल यांनी काढले आहेत.
राजेवालांचे नेतृत्व पंजबामध्ये शेतकरी दिल्ली सीमेवरील आंदोलनाचे मोठे चेहरे राहिलेल्या बलवीर राजेवाल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणार आहेत. शेतकरी संघटनांनी राजेवाल यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले आहे. शेतकऱयांची नजर पंजाबमधील ग्रामीण तसेच निमशहरी क्षेत्रातील 77 मतदारसंघांवर आहे. तेथे शेतकऱयांची मतपेढी प्रभावी आहे.









