मोठे नुकसान न घडविता घटू लागले रुग्ण : भारतासाठी चांगला संकेत
वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
ओमिक्रॉनच्या भीषण लाटेला तोंड देणाऱया जगासाठी चांगले वृत्त समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेने कोरोना विषाणू महामारी फैलावण्यापासून रोखण्यासाठी दोन वर्षांपूर्वी लागू केलेला नाइट कर्फ्यू हटविला आहे. दक्षिण आफ्रिकेतच ओमिक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळून आला होता. देशाने कोरोना महामारीच्या चौथ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू ओलांडला असल्याचे अधिकाऱयांनी म्हटले आहे. या घोषणेनंतर वेगाने फैलावत असलेल्या कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा सामना करत असलेल्या भारतासारख्या देशासाठी यामुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा वाढली आहे.
दक्षिण आफ्रिकेतील अध्यक्षीय कार्यालयाने नॅशनल कोरोना व्हायरस कमांड कौन्सिल (एनसीसीसी) आणि अध्यक्ष समन्वय परिषदेच्या (पीसीसी) बैठका पार पडल्यावर यासंबंधी घोषणा केली आहे. देशात सध्या सुरु असलेल्या संक्रमणाच्या चौथ्या लाटेच्या व्यवस्थापनाबद्दल अद्ययावत माहिती घेण्यात आली. देशात चौथ्या लाटेतील बहुतांश रुग्ण ओमिक्रॉनचे आहेत. कर्फ्यू हटविण्यात येणार असून लोकांच्या प्रवासाच्या वेळेवर कुठलेच बंधन नसणार असे अध्यक्षी कार्यालयाकडून सांगण्यात आले.
चौथ्या लाटेचा तीव्रता कमी होणार
सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सामील होणाऱया लोकांची संख्याही वाढविण्यात आली आहे. बंदीस्त जागेत एक हजार तर मोकळय़ा ठिकाणी 2 हजारांहून अधिक लोकांना एकत्र येण्याची अनुमती दिली जाणार नाही. समारंभ स्थळ छोटी असल्यास आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास वाव नसल्यास क्षमतेपेक्षा निम्म्या लोकांनाच आमंत्रित करता येणार असल्याचे म्हटले गेले. देशाने राष्ट्रीय पातळीवर महामारीच्या चौथ्या लाटेतील टोकाचे संक्रमण ओलांडल्याचे संकेत मिळत असल्याचेही नमूद करण्यात आले.
रुग्णसंख्येत घट
मागील आठवडय़ांमध्ये देशातील 9 प्रांतांपैकी दोन वगळता उर्वरित ठिकाणी रुग्णसंख्या कमी झाली आहे. शनिवारी समाप्त झालेल्या आठवडय़ात 89,781 नवे रुग्ण सापडले आहेत. तर तत्पूर्वीच्या आठवडय़ात 1 लाख 27 हजार 573 नव्या रुग्णांची भर पडली होती. दक्षिण आफ्रिकेत महामारीदरम्यान कोरोनाचे सुमारे 35 लाख रुग्ण सापडले असून 90 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. संचारबंदी शिथिल करण्यामागे लसीकरणाची पातळी, रुग्णालयातील घटती रुग्णसंख्या इत्यादी घटक कारणीभूत आहेत.









