काही आठवडय़ांपूर्वी एक लघुग्रह पृथ्वीच्या खूप जवळ आला आहे. पण आपल्या वृत्तवाहिन्यांना त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. खरं सांगायचं तर आत्ता देखील बिचाऱया वाहिन्या महत्त्वाच्या बातम्यांच्या ओझ्याखाली दबून-गुदमरून गेल्या आहेत. एक तर दिवसागणिक या किंवा त्या उपचार पद्धतीतला कोणी ना कोणी कोरोनावर रामबाण उपाय ठरणारी लस किंवा औषध शोधून काढतो. आता फक्त रेकी, ऍक्मयुपंक्चर, ऍक्मयुप्रेशरद्वारे कोरोनावर उपचारांचा दावा ऐकायचे बाकी आहे. अस्मादिकांचे गणित कच्चे असल्याने या लशींची आणि औषधांची संख्या मोजणे तूर्तास सोडून दिले आहे. हे असं चालू असतानाच कोरोनाची बाधा झालेला जगातील पहिला रुग्ण वृत्तवाहिन्यांना सापडला. त्याचे नाव बिग बी. अखिल जगातला हा पहिलाच रुग्ण असल्याने त्याच्या बातम्यांना यथायोग्य स्थान देणे क्रमप्राप्तच झाले. त्याबद्दल आपली काही तक्रार नाही. आणि समजा, तक्रार असली तरी आपल्याला कोण विचारतो?
तर, त्या लघुग्रहाकडे अंमळ दुर्लक्ष झालं आहे. कोरोनाच्या या भानगडीत त्या लघुग्रहापेक्षा एक मोठी स्वारी नुकतीच–म्हणजे 27 मार्च रोजी-आलेली आहे. सूर्यमालेच्या अगदी जवळ. तिचे नाव निओवाईज. हा धूमकेतू बिचारा सात हजार वर्षांनी आला आहे. आता गेला की पुन्हा सात हजार वर्षे परत येणार नाही. मनात विचार आला. कदाचित या धूमकेतूमध्ये एलियन ऊर्फ परग्रहावरचे प्रगत प्राणी असतील तर ते पृथ्वीवरच्या मानवांचा करोना बरा करतील. मित्राला हा विचार सांगितला तर तो म्हणाला, ‘हट! मानवाने पृथ्वीवर एवढा उन्माद केलाय. निसर्गाची आणि पर्यावरणाची हेळसांड केलीय. एलियन आले तरी हसून आपल्याला म्हणतील, तुमचं तुम्ही निस्तरा.”
निओवाईज हा धूमकेतू आपल्या खूप जवळ आला आहे. काही दिवस दुर्बिण न वापरता दिसू शकेल. जवळ म्हणजे किती? सूर्यापासून साधारण 30 कोटी किलोमीटर आणि पृथ्वीपासून 25 कोटी किलोमीटर अंतरावर.
एका टीव्ही वाहिनीने सांगितले की तो पृथ्वीपासून पाच किलोमीटर अंतरावर आला होता आणि आता निघून गेला आहे. रविवारी बातम्या आल्या की तो अद्याप थांबला आहे. महिनाभर दिसणार आहे.
सहज विचार आला, इतके दिवस स्वारी थांबणार आहे. ज्योतिषी लोक नवजात बालकाच्या कुंडलीत हिचे स्थान आणि परिणाम दाखवतील का?








