प्रतिनिधी बेळगाव :
कोरोनाच्या प्रभावामुळे रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असतानाही रेल्वेने पार्सल रेल्वेच्या माध्यमातून आपले काम सुरू ठेवले होते. नैऋत्य रेल्वे मार्गावर एकूण 157 पार्सल रेल्वे धावल्या आहेत. जीवनावश्यक साहित्य, भाज्या, फळे यासह इतर साहित्य या पार्सल रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱयापर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत.
लॉकडाऊन व त्यानंतरच्या काळात रस्ते वाहतुक अत्यंत धिम्या गतीने सुरू होती. या काळात वस्तुंची ने-आण करण्याची महत्वाची जबाबदारी रेल्वे विभागावर होती. नैऋत्य रेल्वेने यामध्ये पुढाकार घेत औषधे, दूध, फळे, भाजी पाला, मासे, मांसाहारी पदार्थ, मसाले, अंडी, सुके खोबरे यासारख्या साहित्याची ने-आण केली. 1 एप्रिल ते 19 जुलै दरम्यान एकूण 157 पार्सल रेल्वेमधून 19,032 टन साहित्याची ने-आण केली.
बेंगळूर, वास्को, बेळगाव, हुबळी, दावणगेरी यासह इतर भागांमधून विविध साहित्य हे देशभर पाठविण्यात आले. नागालँड, गोहाटी, शानिमार, दीमपूर यासह इतर भागामध्ये हे साहित्य पोहोचविण्यात आले. त्यामुळे प्रवासी रेल्वे वाहतुक बंद असतानाही रेल्वेला आर्थिक उत्पन्न उपलब्ध झाले आहे.









