प्रतिनिधी /बेळगाव :
उद्यमबाग येथे मागील काही वर्षांपासून गटारींची स्वच्छताच झाली नसल्याचे दिसून येत आहे. गटारींची स्वच्छता न झाल्याने माती व कारखान्यांमधील वाळूने त्या भरल्या आहेत. पाणी जाण्यास वाट नसल्यामुळे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. काही ठिकाणी गटारींची अवस्था कचराकुंडीसारखी झाली आहे. यामुळे मनपा व इतर विभागांचे उद्यमबागकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बेळगावची औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असणाऱया उद्यमबागमध्ये अनेक समस्या आहेत. वर्षानुवर्षे या समस्या असून त्याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाही. उद्योजकांनी आवाज उठविल्यानंतरच काही वर्षांपूर्वी गटारी व रस्ते यांची समस्या सुटली होती. परंतु त्यांची स्वच्छता करण्याकडे अजूनही मनपाचे दुर्लक्ष होत आहे. सर्वाधिक आर्थिक उत्पन्न देणाऱया या विभागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
उद्यमबागमधील अनेक गटारींमध्ये वाळू व माती भरली आहे. हा गाळ काढल्यानंतरच गटारी स्वच्छ होणार आहेत. गटारीच नसल्यामुळे नागरिक कचरा रस्त्याच्या शेजारी टाकत आहेत. दारूच्या बाटल्या, प्लास्टिक यामुळे या भागाचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे या परिसराची स्वच्छता होऊन गटारींमधील गाळ काढावा, अशी मागणी होत आहे.
मागील वर्षाची पुनरावृत्ती नको
मागील वषीदेखील गटारी व नाल्यांमधील गाळ न काढल्यामुळे पावसाचे पाणी थेट कारखान्यांमध्ये शिरले होते. यामध्ये कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले होते. तशी परिस्थिती यावषी होऊ नये यासाठी गाळ काढणे गरजेचे होते. परंतु पावसाळय़ाला सुरुवात झाली तरी यावषी अद्याप गाळ काढण्यात आलेला नाही. यामुळे यावषीही जोराचा पाऊस झाल्यास पुन्हा मागील वर्षाप्रमाणे परिस्थिती उद्भवेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.









