वृत्तसंस्था/ डोहा (कतार)
शनिवारी येथे झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील कतार खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत पोलंडच्या इगा स्वायटेकने एकेरीचे जेतेपद पटकाविताना इस्टोनियाच्या कोंटावेटचा पराभव केला.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात स्वायटेकने कोंटावेटचा 6-2, 6-0 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करताना शेवटचे सलग दहा गेम्स जिंकले. डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेतील स्वायटेकचे हे चौथे एकेरीतील अजिंक्यपद असून डब्ल्यूटीए टूर 1000 स्पर्धेतील तिचे हे दुसरे विजेतेपद आहे. स्वायटेकने केवळ तासभराच्या कालावधीत हा अंतिम सामना जिंकला. स्वायटेकने गेल्यावर्षी रोममध्ये झालेल्या डब्ल्यूटीए टूर 1000 ची पहिली स्पर्धा जिंकताना अंतिम सामन्यात प्लीसकोव्हाचा 6-0, 6-0 असा पराभव केला होता.









