प्रतिनिधी /बेळगाव
माहिती हक्क आयोगाअंतर्गत अर्जदाराला माहिती दिली नाही म्हणून तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांना 12 हजार रुपयांचा दंड करण्यात आला होता. माहिती हक्क आयोगाकडे 10 हजार तर अर्जदाराला 2 हजार रुपये अशी रक्कम देण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार तहसीलदारांनी ती रक्कम ऍड. लक्ष्मण पाटील यांना दिली. सदर वकिलांनी ती रक्कम नर्सिंग शिक्षण घेणाऱया विद्यार्थिनीला दिली.
सावगाव येथील जमिनीची भू-नोंदणी संदर्भात दिलेली वर्दी द्यावी असा अर्ज ऍड. लक्ष्मण पाटील यांनी तहसीलदारांकडे केला होता. मात्र, ती माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे माहिती हक्क आयोगाने तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांना त्यांच्या वेतनामधून 12 हजार रुपये कपात करण्याबाबत सूचना केली. त्यानुसार 10 हजार रुपये माहिती आयोगाकडे वर्ग करण्यात आले, तर दोन हजार रुपयांचा धनादेश ऍड. लक्ष्मण पाटील यांना देण्यात आला होता.
तहसीलदारांना दणका
मात्र ही रक्कम आपल्याकडे न ठेवता तो धनादेश सोनल छायाप्पा मोदगेकर या विद्यार्थिनीला दिला आहे. माहिती हक्क आयोगाअंतर्गत माहिती दिली नसल्याने चांगलाच दणका तहसीलदारांना बसला. सदर रक्कम देताना ऍड. सतीश बिरादार, ऍड. अमृत कोल्हटकर, ऍड. बबन गुरव, कृष्णा पाटील आणि छायाप्पा मोदगेकर हे उपस्थित होते.









