आदर्शनगर कॉर्नर परिसरात जलवाहिनीला गळती
प्रतिनिधी /बेळगाव
आदर्शनगर परिसरात आरपीडी रोडवर एका बाजूला लागलेल्या गळतीचे निवारण वर्षभरानंतर करण्यात आले. मात्र आता याच रस्त्यावर ग्रामीण पोलीस स्टेशन लगत लागलेल्या गळतीद्वारे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे आता या गळतीचे निवारण करण्यास किती वर्षे लागणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
आरपीडी रोडवर आयएमईआरसमोर रस्त्याच्या दुभाजकाच्या ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्याने शेकडो लिटर पाणी वाया जात होते. या गळतीची माहिती पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांना होती. तरी देखील दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. गळतीकडे दुर्लक्ष करून स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. त्यामुळे या गळतीद्वारे दररोज पाणी वाया जात होते. वर्षभरानंतर या गळतीचे निवारण करण्यात आले. मात्र आता याच परिसरात ग्रामीण पोलीस स्थानकाजवळ जलवाहिनीला गळती लागली असून, दररोज पाणी रस्त्यावरून वाहत आहे. आदर्शनगर कॉर्नरजवळ लागलेल्या गळतीचे निवारण करण्याची मागणी सातत्याने करण्यात आली. पण एल ऍण्ड टी कंपनीने याकडे दुर्लक्ष केले आहे. एकीकडे शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे पाणी वाया जात आहे.









