सांडपाणी पाझरून विहिरी-कूपनलिकांचे पाणी दूषित
प्रतिनिधी /बेळगाव
नाल्यामध्ये टाकण्यात येणाऱया कचऱयामुळे आणि ठिकठिकाणी झालेल्या अतिक्रमणामुळे प्रत्येक पावसाळय़ात मराठा कॉलनी आणि नानावाडी परिसरात पाणी साचते. मात्र आता रेल्वे खात्याच्या कामासाठी काँग्रेस रोडशेजारी नाल्यावर पाईप घालण्यात आल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी सांडपाणी साचून परिसरातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे.
सध्या शहरात सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना विहिरी आणि कूपनलिकांवर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र विहिरी आणि कुपनलिकांचे पाणी देखील दूषित बनल्याने नागरिकांच्या समस्येत आणखीनच भर पडली आहे. रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यात येत आहे. तसेच रेल्वेस्थानक ते पहिले रेल्वेगेटपर्यंत 5 मार्ग तयार करण्यात येत आहेत. साहित्य घेऊन येणाऱया वाहनांना ये-जा करण्यासाठी काँग्रेस रोडवरून मार्ग करण्यात आला आहे. पण काँग्रेस रोडलगत नाला असल्यामुळे वाहनांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्याकरिता नाल्यावर पाईप घालून तात्पुरता रस्ता करण्यात आला आहे. पण एकच पाईप घालण्यात आल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी नाल्यामध्ये सांडपाणी साचून राहत आहे. याचा फटका परिसरातील रहिवाशांना बसत आहे. साचलेले सांडपाणी विहिरी आणि कूपनलिकांमध्ये पाझरत असल्याने पाणी दूषित बनले आहे.
त्यामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे. याठिकाणी निर्माण झालेल्या समस्येचे निवारण करण्याच्या दृष्टीने नाल्यातील पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा, याकरिता उपाय-योजना राबविण्यात याव्यात. या परिसराची पाहणी करून नाल्यावर जादाचे पाईप घालून रस्ता करावा, अशी मागणी होत आहे.









