चिपळुणात कोरोनायोध्दांना प्रजासत्ताकदिनी अनोखी सलामी
प्रतिनिधी/ चिपळूण
तुम्ही होता, आहात, म्हणून आम्ही आहोत असे आभार मानणारा देखावा साकारत शहरातील पाग-बौध्दवाडी येथील तरूण मंडळाने कोरोना योध्दांना प्रजासत्ताकदिनी अनोखी सलामी दिली. तसेच कोरोनात शहीद कोविड योद्धय़ांनाही श्रध्दांजली वाहण्यात आली.
गेल्या अनेक वर्षापासून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताअ; हे मंडळ वर्षभरातील चालू घडामोडींवरदेखावा साकारून नागरिकांचे लक्ष वेधत आहे. यावर्षी या देखाव्याच्या माध्यमातून कोरोना काळात सेवा देणाऱयांचा सन्मान करण्यात आला. या कठीण कालखंडात जनता जरी घरी सुरक्षित राहिली असली तरी त्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस दल, महसूल, नगर परिषद व अन्य विभागांचे अधिकारी, कर्मचारी सेवा बजावताना दिसत होते. त्यामुळे त्यांचे आभार मानणारा देखावा यावर्षी या मंडळाने साकारला आहे.
देखाव्याजवळ भव्य फलक उभारून या काळात विविध क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱयांनी कशी सेवा दिली याची सचित्र झलक दाखवण्यात आली आहे. त्यावर ‘तुम्ही होता, आहात, म्हणून आम्ही सुरक्षित आहोत’ असे नमूद करण्यात आले आहे. तसेच शहीद कोविड योध्दांना श्रध्दांजली वाहण्यात आली आहे. तसेच अमर जवान प्रतिकाच्या माध्यमातून जवानांच्या कार्यालाही सलाम करण्यात आला आहे.









