वार्ताहर / राजापूर
तालुक्यातील धाऊलवल्ली पारवाडी येथे शिकाऱयाला गोळी लागून झालेल्या मृत्यूबाबत सध्या या परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या अनिल धालवलकर यांना लागलेली गोळी त्यांच्याकडील बंदुकीतून सुटलेली होती की हा केवळ दिखाऊपणा आहे, असा शंकायुक्त सवाल सध्या उपस्थित होत आहे.
तालुक्यातील नवेदर येथील अनिल धालवलकर हे अन्य एका सहकाऱयासह लगतच्या धाऊलवल्ली पारवाडी येथील जंगलात शिकारीसाठी गेले होते. यावेळी धालवलकर यांच्याजवळ असलेल्या बंदुकीतून अचानक गोळी सुटून ती त्यांच्या पोटाच्या भागाकडे लागली. यामध्ये धालवलकर यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली होती. या प्रकरणी नाटे पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीत धालवकर यांच्याकडे असलेल्या बंदुकीतून गोळी सुटून त्यांना लागल्याचे नमूद असले तरी शिकारीसाठी जंगलात फिरताना अन्य कोणीतील डुकरावर झाडलेली गोळी धालवलकर यांना लागल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. तसेच शिकारीसाठी दोघेच गेलेले नव्हते, तर अन्य काहीजणही त्यांच्यासोबत शिकारीला गेले होते. धालवलकर यांना गोळी लागून मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्यांनी एका हॉटेलवर एकत्र जमून चर्चा केली. त्यानंतर धालवलकर यांचा मृतदेह त्यांच्या घरी नेऊन ठेवल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनीही मृतदेह धालवलकर यांच्या घरीच आढळून आला. जर धालवलकर यांना त्यांच्याजवळीलच बंदुकीची गोळी लागली होती तर मृतदेह जागेवरून का हलविण्यात आला, अशी चर्चा सध्या या परिसरात सुरू आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर धालवलकर यांना गोळी जवळून लागली की लांबून ते स्पष्ट होणार असून त्यानंतर या घटनेमागील सत्य बाहेर येणार आहे.








