कारावासाची शिक्षा पूर्ण – कोरोनाची बाधा असल्याने बेंगळूरमधील इस्पितळात घेत आहेत उपचार
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी मागील चार वर्षांपासून कारागृहात असलेल्या तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निकटवर्तीय आणि एआयएडीएमकेच्या माजी नेत्या व्ही. के. शशिकला नटराजन (वय 66) यांची बुधवारी कारागृहातून मुक्तता करण्यात आली आहे. आता त्या तामिळनाडूच्या सक्रिय राजकारणात पुन्हा सहभागी होतील, अशी चर्चा आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्या सध्या बेंगळूरच्या व्हिक्टोरिया इस्पितळात उपचार घेत असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे.
सुमारे 66 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्ता संपादनाच्या आरोपप्रकरणी विशेष न्यायालयाने दोषी ठरविण्यानंतर फेब्रुवारी 2017 पासून शशिकला नटराजन या बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहात शिक्षा भोगत होत्या. त्यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुधवारी त्यांची कारागृह प्रशासनाने मुक्तता केली आहे. कोरोनामुळे त्यांच्यावर मागील आठवडय़ापासून बेंगळूरच्या व्हिक्टोरिया इस्पितळात उपचार सुरू आहेत. जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या प्रारंभी त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्या इस्पितळात असल्याने कारागृह अधिकाऱयांनी शशिकला यांची कारागृहात स्वाक्षरी घेऊन सुटकेची प्रक्रिया पूर्ण केली. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या इस्पितळातून थेट तामिळनाडूला जाऊ शकतात.
शशिकला नटराजन यांची कारागृहातून मुक्तता झाल्याने त्यांच्या समर्थकांनी इस्पितळाबाहेर जयघोष करत मिठाई वाटप करून व फटाके फोडून जल्लोष केला. तामिळनाडूत समर्थकांनी शशिकला यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी शशिकला यांची पुन्हा कोविड चाचणी केली जाणार आहे. जर अहवाल निगेटिव्ह आल्यास जानेवारीच्या अखेरीस त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज मिळणार आहे. त्यानंतर त्या थेट तामिळनाडूला परततील, असे सांगितले जाते.









