पंतप्रधान मोदींनी केला वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतीचा उल्लेख
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तामिळनाडूमधील 11 नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन केले. पंचविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील विकासावर प्रकाश टाकला. 2014 मध्ये देशात सुमारे 82 हजार वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर जागा होत्या. गेल्या सात वर्षांत ही संख्या सुमारे 1 लाख 48 हजार जागांवर पोहोचली असून सुमारे 80 टक्क्मयांनी वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. भारतातील तरुणांच्या मनाला आकार देणे आणि त्यांना राष्ट्र उभारणीसाठी एकसंघ शक्तीमध्ये रुपांतरित करणे हा या युवा महोत्सवाचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.
2014 मध्ये आपल्या देशात एकूण 387 वैद्यकीय महाविद्यालये होती. गेल्या सात वर्षांत ही संख्या 596 वैद्यकीय महाविद्यालयांवर पोहोचली आहे. यात सुमारे 54 टक्के वाढ झाली आहे. तसेच 2014 मध्ये देशात केवळ सात ‘एम्स’ होती. आता मान्यताप्राप्त एम्सची संख्या 22 वर गेली असल्याचे सांगत वैद्यकीय शिक्षण क्षेत्र अधिक पारदर्शक करण्यासाठी विविध सुधारणा हाती घेण्यात आल्याचे व्हर्च्युअल समारंभात बोलताना पंतप्रधानांनी सांगितले. तामिळनाडूमधील नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यासाठी सुमारे 4 हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्यापैकी सुमारे 2 हजार 145 कोटी रुपये केंद्र सरकार आणि उर्वरित तामिळनाडू सरकारने दिले आहेत. विरुधुनगर, नमक्कल, निलगिरी, तिरुपूर, तिरुवल्लूर, नागापट्टिनम, दिंडीगुल, कल्लाकुरीची, अरियालूर, रामनाथपुरम आणि कृष्णगिरी या जिह्यांमध्ये नवीन महाविद्यालये उभारण्यात आली आहेत. आर्थिकदृष्टय़ा परवडणाऱया वैद्यकीय शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि देशाच्या सर्व भागात पायाभूत आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने ही वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली आहेत.
वैद्यकीय सुविधा सर्वांसाठी सुलभ करण्यासाठी पुढाकार
पंतप्रधानांनी कोविड-19 महामारीबद्दल बोलताना वैद्यकीय क्षेत्राचे महत्त्व सांगितले. भविष्य हे आरोग्य सेवेत गुंतवणूक करणाऱयांचेच असेल. भारत सरकारने या क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या आहेत. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेच्या मदतीने गरिबांना उच्च दर्जाची आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध केल्याचा दावाही त्यांनी केला.
निबंधांचे अनावरण
राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी ‘माझ्या स्वप्नांचा भारत’ आणि ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे अज्ञात नायक’ या विषयावरील निवडक निबंधांचे अनावरणही केले. दोन विषयांवर एक लाखाहून अधिक तरुणांनी सादर केलेल्या निबंधांमधून या निबंधांची निवड करण्यात आली आहे.









