5.59 टक्क्यांवर पोहोचला दर : खाद्यपदार्थ महागले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
किरकोळ महागाई दर डिसेंबर महिन्यात वाढून 5.59 टक्के झाला आहे. नोव्हेंबरमध्ये हा दर 4.91 टक्के इतका होता. खाद्यपदार्थ तसेच धान्याच्या किमती वाढल्याने महागाई दरात भर पडली आहे. तर दुसरीकडे नोव्हेंबर महिन्यात औद्योविक उत्पादन विकास (आयआयपी) 1.4 टक्के राहिला आहे. मागील वर्षी याच महिन्यात आयआयपीचा विकासदर उणे 1.6 टक्के होता. तर ऑक्टोबर महिन्यात आयआयपी विकासदर 3.2 टक्के होता. बुधवारी याचे आकडे प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
महागाईचे आकडे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कम्फर्ट झोनमध्ये राहिले आहेत. आरबीआयचे महागाई दर 4 टक्के (प्लस किंवा मायनस 2 टक्के) स्तरावर कायम ठेवण्याचे लक्ष्य आहे.
खाद्य महागाई डिसेंबरमध्ये वाढून 4.05 टक्के झाली आहे. नोव्हेंबरमध्ये हा आकडा 1.87 टक्के राहिला होता. भाज्याचा महागाईदर मासिक आधारावर डिसेंबरमध्ये उणे 13.62 टक्क्यांच्या तुलनेत उणे 2.99 टक्के राहिला आहे.
वस्त्र तसेच पादपात्र महागाईदर डिसेंबरमध्ये 7.94 टक्क्यांच्या तुलनेत 8.3 टक्क्यांवर पोहोचला आहे. डाळींच्या दरात नोव्हेंबरमध्ये 3.18 टक्क्यांची वाढ दिसून आली होती. डिसेंबरमध्ये हा दर कमी होत 2.43 टक्के झाला आहे.
इंधन आणि वीज महागाई दर डिसेंबरमध्ये 10.95 टक्के राहिला आहे. तर नोव्हेंबरमध्ये हा आकडा 13.35 टक्के इतका होता. गृह महागाईदर डिसेंबरमध्ये 3.66 टक्क्यांच्या तुलनेत 3.61 टक्के राहिला आहे.









