पूर्ण झाले चित्रपटाचे चित्रिकरण
अभिनेत्री नेहा धूपिया आणि अंगद बेदी यांच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. लवकरच प्रेक्षक या दोघांना मोठय़ा पडद्यावर एकत्र पाहू शकतील. नेहा धूपिया आणि अंगद यांच्या विवाहाला जवळपास 5 वर्षे झाली आहेत. दोघांमधील केमिस्ट्री चाहत्यांना पसंत आहे. आता दोघेही चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. हा चित्रपट विनोदी धाटणीचा असून याची कहाणी चेतन भगत यांनी लिहिली आहे.
2002 साली फेमिना मिस इंडियाचा मान मिळविणाऱया नेहाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर अंगद बेदी देखील उत्तम अभिनेत्यांमध्ये गणला जातो. मोठय़ा पडद्यावर आता दोघेही प्रेक्षकांना हसविताना दिसून येतील. चेतन भगत यांच्या या चित्रपटात दोघेही विवाहित जोडप्याची भूमिका साकारणर आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण मुंबईत पूर्ण झाले आहे.
चित्रपटात अंगद हा राघवन राव ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर नेहा त्याची पत्नी सावीच्या भूमिकेत दिसून येणर आहे. कोरोना महामारीदरम्यान लागलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर कहाणी बेतलेली आहे. नेहा आणि अंगद यापूर्वी ‘रंगीले’ या पंजाबी चित्रपटात एकत्र दिसून आले होते. 2014 मध्ये दोघांनी करण जौहरचा चित्रपट ‘उंगली’मध्ये काम केले होते, परंतु हा चित्रपट यशस्वी ठरला नव्हता. नेहा आणि अंगदने 2018 मध्ये विवाह केला होता. दोघांनी एक मुलगी आणि एक मुलगा आहे.









