बेळगाव शहर पोलिसांचे मात्र दुर्लक्ष : महिनाभरात पाच तक्रारी दाखल : कर्नाटकात ‘बड्स’ कायद्यांतर्गत कारवाईला सुरुवात
प्रतिनिधी /बेळगाव
मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. अशा कंपन्या शोधून त्यांना कायद्याचा हिसका दाखविण्याची जबाबदारी असलेले शहर पोलीस खाते विश्वामित्री पवित्रा घेत आहे. जिल्हा पोलिसांनी मात्र अशा पाच कंपन्यांविरुद्ध कारवाई केली आहे. कर्नाटकात ‘बड्स’ कायद्यांतर्गत कारवाईला सुरुवात केली आहे. यापैकी बहुतेक प्रकरणात पोलीस अधिकाऱयांनीच स्वतः होऊन फिर्याद दिली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी आदी वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव, चिकोडी, अथणी, गोकाक परिसरातील पाच कंपन्यांवर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. केवळ एका प्रकरणात फशी पडलेल्या गुंतवणूकदारांनी फिर्याद दिली आहे. उर्वरित चारही प्रकरणात पोलीस अधिकाऱयांनी स्वतःहून फिर्याद दिली आहे.
बेळगाव शहर व उपनगरात सध्या बाराहून अधिक मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या कंपन्या कार्यरत आहेत. आपण फशी पडणार, याची पुरेपूर कल्पना असूनही झटपट श्रीमंतीच्या मोहापायी लोक अशा कंपन्यांत मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत. यासंबंधी जनमानसात जागृती करून पूर्वखबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. बेळगाव शहर पोलिसांनी मात्र आधी फिर्याद येऊ द्या, मग कारवाई करू, असे सांगत चालढकल सुरू केली आहे.
जिल्हा पोलिसांनी मात्र फिर्याददाराची वाट न पाहता स्वतःहून कारवाई सुरू केली आहे. एका चिकोडी पोलीस स्थानकात तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. चिकोडी व टिळकवाडी-बेळगाव येथे कार्यरत असलेल्या वायका या कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव येथील सिद्धार्थ जंबगी याच्यावर 2 डिसेंबर रोजी एफआयआर दाखल झाला आहे.
चिकोडी पोलीस स्थानकात अंकली येथील रविकिरण कमलाकर व संतोष मोहिते रा. नणदी यांच्या आयएफटी या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याच पोलीस स्थानकात संतोष घोडके रा. हुन्नरगी, पंकज पाटील, रा. तासगाव, जि. सांगली या दोघा जणांविरुद्ध पिनोमिक व्हेंचर्स या कंपनीसंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही तिन्ही प्रकरणे पोलीस उपनिरीक्षक यमनाप्पा मांग यांच्या फिर्यादीवरून दाखल झाली आहेत.
वर्षभरात पैसे दुप्पट
वर्षभरात पैसे दुप्पट करण्याचे सांगून गुंतवणूक करून घेण्यात येत होती. गुंतवणुकीच्या बदल्यात त्यांना बाँड दिला जातो. यासाठी कसल्याही प्रकारची परवानगी नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आता अथणी पोलीस स्थानकात विजय होनकांबळे व रेश्मा होनकांबळे यांच्या मोहनज्योती वनमार्ट या कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक कुमार हाडकार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
एक लाख रुपये गुंतवणूक केल्यानंतर पुढील एक वर्ष दरमहा 5 हजार रुपये व एक वर्षानंतर आपण गुंतवणूक केलेले एक लाख रुपये परत करण्याचे सांगण्यात येत होते. जर साखळी पद्धतीने आणखी गुंतवणूकदार जोडून दिल्यास प्रत्येक गुंतवणूकदारामागे दरमहा 2 हजार रुपये कमिशन देण्याचे आमिष दाखविण्यात येत होते.
पहिले प्रकरण 24 नोव्हेंबर 2021 रोजी गोकाक पोलीस स्थानकात दाखल झाले आहे. भीमशी हेगडे व त्याच्या साथीदारांनी चालविलेल्या स्टार्टमनी डॉट इन या वेबसाईटच्या माध्यमातून गुंतवणूक करून घेऊन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर केवळ महिनाभरात संपूर्ण जिल्हय़ात पाच प्रकरणे दाखल झाली आहेत. सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून जिल्हा पोलीसप्रमुखांनी स्वतः पुढाकार घेऊन अशा कंपन्यांविरुद्ध कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. आता नागरिकांनी सावध होण्याची गरज आहे.
बेळगाव-सांगलीतही कंपन्या
चिकोडी पोलीस स्थानकात ज्या वायका रिटेल अँड टेक्नॉलॉजीस या कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल झाले आहे, त्या कंपनीचा व्यवहार बेळगाव येथेही चालतो. सोमवार पेठ, टिळकवाडी येथे तिचे कार्यालय आहे. बेळगाव शहर पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळेच अशा कंपन्या फोफावल्या आहेत. तर पिनोमिक व्हेंचर्स एलएलपी या कंपनीचे कामकाज सांगली येथील भारती विद्यापीठाजवळील एका इमारतीतून चालते, अशी पोलिसांनी माहिती दिली आहे.









