मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार : गावोगावी जनजागृती बैठका : सीमवासियांची एकजूट पुन्हा दाखवून देणार

वार्ताहर /किणये
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्याला मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचा ठाम निर्धार तालुक्यातील नागरिकांनी केला आहे. महामेळाव्यासंदर्भात जनजागृती बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज तालुक्यात एकच आवाज घुमणार आहे चलो महामेळावा.
सुवर्ण विधानसौध येथे सरकारच्यावतीने होणाऱया हिवाळी अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी व सीमावासियांवर सातत्याने होणाऱया अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व सीमवासियांची एकजूट दाखवण्यासाठी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला सीमाबांधव बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत. महामेळाव्यासंदर्भात गेल्या पंधरा ते 20 दिवसापासून तालुक्यातील विविध गावांमध्ये जनजागृती बैठका घेऊन समितीच्या वरिष्ठ नेते मंडळींनी सीमाप्रश्न व महामेळाव्यासंदर्भात तरुणांना मार्गदर्शन केले आहे.

सीमाबांधवांवर प्रशासनाकडून अन्याय
मराठी संस्कृती व मराठी भाषा जपण्यासाठी सीमवासीय धडपडताना दिसतो आहे. आम्हा सीमाबांधवांवर प्रशासनाकडून वारंवार अन्याय होत आलेला आहे. सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात असून आपली रस्त्यावरची लढाईही सुरू ठेवली पाहिजे, यासाठी हा महामेळावा असून या मेळाव्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपली एकजूट दाखवून देण्याचा निर्धार सीमाबांधवांनी केलेला आहे.
हंगरगा, मंडोळी, सावगाव, कुद्रेमनी, किणये यासह तालुक्याच्या विविध गावांमध्ये झालेल्या महामेळाव्यासंदर्भात झालेल्या बैठकांमध्ये दीपक दळवी, मनोहर किणेकर, मनोज पावशे, शिवाजी सुंठकर, संतोष मंडलिक व इतर नेते मंडळींनी मार्गदर्शन केलेले आहे.
सीमाप्रश्नाच्या या लढय़ासाठी तालुक्यातील अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. काही जणांनी तुरुंगवास भोगला आहे. या हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण साऱयांनीच करायला हवे. सीमाप्रश्नाच्या लढाईत चौथी पिढी सुद्धा सक्रिय झालेली आहे. आम्हाला न्याय देवता न्याय देईल तोपर्यंत आपली रस्त्यावरची लढाई चालूच ठेवली पाहिजे. त्या अनुषंगानेच आज होणाऱया या महामेळाव्याला सीमाबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
बिजगर्णी, कावळेवाडी भागात जनजागृती
किणये : महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवारी आयोजित केलेल्या महामेळाव्यासंदर्भात रविवारी बेळगाव शिवसेना व महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कावळेवाडी, बिजगर्णी भागात जनजागृती करण्यात आली. यावेळी शिवसेना बेळगाव जिल्हा अध्यक्ष प्रकाश शिरोळकर, शिवाजी सुंठकर, निंगाप्पा जाधव, यल्लाप्पा बेळगावकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांच्या घरोघरी जाऊन तसेच गावागावांमध्ये भेटी देऊन व शेतशिवारातसुद्धा जाऊन समिती व शिवसेनेच्या नेतेमंडळींनी जनजागृती करून सर्वांना मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.









