कॅम्प येथील प्रकार, बराचकाळ वाहतूक कोंडी
प्रतिनिधी/ बेळगाव
ऊस वाहतूक करणारा ट्रक जलवाहिन्या घालण्यासाठी काढण्यात आलेल्या चरीमध्ये अडकल्याची घटना शनिवारी दुपारी कॅम्प परिसरात घडली. ट्रॅफिक पोलीस स्टेशनसमोर ऊस वाहतूक करणारा ट्रक चरीमध्ये अडकल्याने बराचकाळ वाहतूक कोंडी झाली.
मागील काही दिवसांपासून कॅन्टोन्मेंट परिसरात एल अॅण्ड टी कंपनीकडून जलवाहिन्या घातल्या जात आहेत. यासाठी चरी मारण्यात आल्या होत्या. जलवाहिन्या घातल्यानंतर त्यावर तात्पुरत्या स्वरुपात माती पसरविण्यात आली. परंतु वाहनांची ये-जा सुरू असल्याने घातलेली माती खचू लागली आहे. शनिवारी दुपारी कॅम्प येथून ऊस वाहतूक करणारा ट्रक चरीमध्ये अडकला.
जलवाहिन्या घालण्यासाठी काढलेल्या चरी त्वरित बुजवण्याची मागणी
रहदारी पोलीस स्थानकासमोरच मुख्य कॉर्नरला ट्रक अडकल्याने बराचकाळ वाहतूक कोंडी झाली होती. उसाने भरलेला ट्रक असल्याने पुढे-मागे करणेही अशक्य होत होते. बऱ्याच प्रयत्नांनंतर ट्रक चरीतून बाहेर काढण्यात आला. असेच प्रकार कॅन्टोन्मेंट परिसरात इतर ठिकाणीही घडत आहेत. त्यामुळे जलवाहिन्या घालण्यासाठी काढण्यात आलेल्या चरी त्वरित बुजवाव्यात, अशी मागणी केली जात आहे.









