- सार्वजनिक कार्यक्रमांसाठी परवानगी आवश्यक
ऑनलाईन टीम / नाशिक :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यातच नाशिक शहरात देखील रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सक्रिय संख्या 400 च्या वर गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये आज पासून (9 मार्च) 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. यासोबतच खासगी क्लास देखील बंद ठेवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अध्ययन करावे, शहरातील लग्नसोहळे व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी यापुढे प्रभाग अधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक राहणार असल्याचे महापौर ताहेरा शेख यांनी सांगितले.
ते म्हणाले, शहरातील रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईनचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सामान्य रुग्णालये पूर्णपणे कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. सहारा रुग्णालयात 200 खाटांची सोय करण्यात आली आहे.
याशिवाय महापालिका हद्दीत मास्क न घालणाऱ्यांवरएक हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रम, लग्नसोहळे यासाठी मंगल कार्यालय, लॉन्स मालक, आयोजक यांना पहिल्यांदा परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. या कार्यक्रमांसाठी केवळ 50 लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. 50 पेक्षा अधिक नागरिक आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहरात आणखी रुग्ण संख्या वाढू नये यासाठी प्रत्येकाने स्वतः ची काळजी स्वतः घेण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी महापौरांकडून करण्यात आले आहे.








