दुसऱया-तिसऱया टप्प्यातील चाचणीला ‘डीसीजीआय’ची परवानगी
पुणे / प्रतिनिधी
कोरोनावरील लसीच्या दुसऱया आणि तिसऱया टप्प्यावरील चाचणीला केंद्रीय औषध महानियंत्रकांनी अर्थात ‘डीसीजीआय’कडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लसीच्या निर्मितीचा मार्ग दृष्टिक्षेपात आल्याचे दिसत आहे.
या लस निर्मितीसंदर्भात ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत सिरम इन्स्टिटय़ूटचा करार झाला आहे. लसीच्या चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. आता दुसऱया व तिसऱया टप्प्यालाही मंजुरी देण्यात आल्याचे सिरमच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. कोरोनाने भारतासह जगभरात कहर केला असून, यावरील लसीसंदर्भात जगभर संशोधन सुरू आहे. त्यामुळे यावरील लस कधी येणार, याबाबत उत्सुकता आहे. याअंतर्गत देशातील 1,500 जणांवर चाचण्या करण्यात येणार असून, त्यासाठी ही परवानगी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
लसीचा प्रभावीपणा उलगडणार
याशिवाय तिसऱया टप्प्यातील वैद्यकीय चाचणी सुरू करण्याआधी संबंधित माहिती केंद्रीय औषध नियंत्रण संस्थेकडे जमा करावी लागणार आहे. या चाचणीत सहभागी झालेल्या व्यक्तीस चार आठवडय़ांच्या आत दोन डोस दिले जाणार आहेत. पहिला डोस दिल्यानंतर 29 व्या दिवशी दुसरा डोस दिला जाईल. त्यातून सुरक्षेच्या दृष्टीने कोरोनाशी लढण्याकरिता लस किती प्रभावी आहे, हे समजू शकेल, असे वरिष्ठ अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.
भारताच्या आशा पल्लवित
सिरम इन्स्टिटय़ूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी आम्ही निश्चितपणे लस बाजारात आणणार आहोत. कोणतीही घाई वा गडबड न करता अत्यंत सुरक्षित, प्रभावी व परिणामकारक लस आणण्यात येईल, असे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. आता पुढील टप्प्यांतील चाचण्यांसाठी परवानगी प्राप्त झाल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. या चाचण्यांतून इंग्लंडमध्ये दिसून आलेल्या रोगप्रतिकारशक्तीप्रमाणे देशात रोगप्रतिकारशक्ती मिळेल का, हे पाहिले जाणार आहे.









