खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील रस्ते, पाणी, आरोग्य सेवा यासारख्या विकासाकडे आमदार अंजली निंबाळकर यांनी आता विशेष लक्ष घातले आहे. त्यांच्या प्रयत्नाने गेल्या वर्षभरात प्रमुख रस्त्यांचा विकास, पाणी योजना तसेच बसस्थानकांच्या नूतनीकरणासाठी कोटय़वधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आता राष्ट्रीय आरोग्य अभियान तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्यावतीने खानापूर शहरात 60 खाटांच्या माता आणि शिशु इस्पितळाच्या उभारणीसाठी 15 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तालुका इस्पितळाच्या आवारात बेळगाव-गोवा महामार्गाच्या दर्शनी बाजूला हे सुसज्ज इस्पितळ उभारण्यात येणार आहे. आमदार अंजली निंबाळकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सरकारी आरोग्य व्यवस्थेला सक्षम करणाऱया या विशेष इस्पितळाला मंजुरी मिळाली आहे.
सध्या तालुका इस्पितळात तपासणी व चिकित्सेसाठी येणाऱया गर्भवती, माता आणि शिशु रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे दवाखान्यात आलेल्या सर्व रुग्णांना वेळेत व जलद सेवा देणे कठीण होत आहे. बाह्यरुग्ण आणि दाखल होणाऱया रुग्णांच्या संख्येतही झपाटय़ाने वाढ होत आहे. परिणामी ओपीडीबाहेर रुग्णांची गर्दी होऊन परवड होत आहे. रुग्णांसह डॉक्टरांनाही जागेच्या कमतरतेमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करून सरकारी इस्पितळाच्या आवारात नवीन माता आणि शिशु विभाग सुरू करण्यात यावा, अशी मागणी आमदार अंजली निंबाळकर यांनी केली होती.
राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनअंतर्गत खानापूर शहरात स्वतंत्र माता आणि शिशु विभाग (एमसीएच) उभारण्यासाठी 15 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मंजूर झालेल्या 15 कोटी अनुदानामध्ये इस्पितळ इमारतीसाठी 12 कोटी 77 लाख, उपकरणांच्या खरेदीसाठी 60 लाख आणि अन्य सामग्रीसाठी 1 कोटी 64 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या इस्पितळात अतिदक्षता विभागाचीही सोय करण्यात येणार आहे.









