केवळ धार्मिक विधी होणार : देवस्थान व्यवस्थापन समितीची माहिती
प्रतिनिधी/ निपाणी
कर्नाटक व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आडी (ता. निपाणी) येथील श्री दत्त मंदिरात दरवषी मोठय़ा प्रमाणात दत्त जयंती उत्सव साजरा होतो. मात्र, यंदा कोरोनामुळे हा उत्सव रद्द करण्यात आला असून केवळ धार्मिक विधी होणार आहेत, अशी माहिती देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने देण्यात आली आहे.
आडी येथील दत्त देवस्थान हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातून मोठय़ा प्रमाणात भाविक येथे सातत्याने येत असतात. दत्त जयंतीनिमित्ताने उत्तराखंड, उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश आदी अनेक राज्यांमधून साधुसंतही येत असतात. यावेळी साधुसंतांची प्रवचने, भजन, जन्मकाळ सोहळा, महाप्रसाद मोठय़ा प्रमाणात होतो. परंतु यावषी कोरोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना बोलावण्यात येणार नाही. येथील आश्रमस्थांच्या उपस्थितीत दत्त जन्मसोहळा साध्या पद्धतीने होणार आहे. ज्यांना परमाब्धि व गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करायचे असेल त्यांनी ते पारायण आपापल्या घरीच करावे. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून हे देवस्थान शासकीय नियमानुसार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद ठेवण्यात आले आहे. नऊ महिन्यांपासून सर्व भाविकांनी या निर्णयाला साथ दिली आहे. त्याचप्रमाणे आताही भाविकांनी घरी राहूनच दत्त जयंतीदिवशी दत्तगुरुंचे स्मरण, नामचिंतन करावे, असे आवाहन हार्दायन, दत्त देवस्थान मठ यांच्यावतीने करण्यात आले आहे.









