पंतप्रधान मोदी यांनी केले अभिनंदन
@ गुवाहाटी / वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाचे नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनी आसामचे पंधरावे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण केले आहे. राज्यपाल जगदीश मुखी यांनी त्यांना एका साध्या समारंभात सोमवारी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे ट्विटर संदेशाद्वारे अभिनंदन केले.
आसाममध्ये भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील आपल्या मित्रपक्षांसमवेत पुन्हा एकदा सत्ता पटकाविली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला राज्यातील 126 जागांपैकी 75 जागा मिळाल्या आहेत. यांपैकी भाजपच्या 60, आसाम गणपरिषदेच्या 9 तर स्थानिक पक्षाच्या सहा आहेत. काँगेससह विरोधी पक्षांच्या आघाडीला 50 जागा मिळाल्या आहेत, तर 1 जागा अपक्षाने घेतली आहे.
सोनोवाल यांच्या जागी हेमंत बिस्वा शर्मा
2016 ते 2021 या पाच वर्षांच्या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्रिपद भाजप नेते सर्वानंद सोनोवाल यांनी सांभाळले होते. तथापि, यावेळी शर्मा यांना संधी देण्यात आली आहे. दिल्लीत भाजपच्या बैठकीत शर्मा यांची निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर शर्मा यांनी ट्विटरच्या माध्यमातून जनतेचे आभार मानले. जनतेसाठी अधिकच जोमाने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींचेही त्यांनी ही संधी दिल्यामुळे आभार मानले. आसामसह ईशान्य भारतात भाजपचा प्रभाव अधिकाधिक वाढविण्यासाठी आपण कार्यरत राहू असे प्रतिपादन त्यांनी केले.
अल्पपरिचय…
55 वर्षांचे हेमंत बिस्वा शर्मा यांचे शिक्षण डॉक्टरेट पर्यंत झाले असून ते कायद्याचे पदवीधरही आहेत. ऑल आसाम स्टुडंट्स् युनियन (आसू) या विद्यार्थी संघटनेतून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाचा प्रारंभ झाला. त्यावेळी माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल हे देखील याच संघटनेत कार्यरत होते. या विद्यार्थी संघटनेतूनच पुढे आसाम गण परिषद या राजकीय पक्षाचा जन्म झाला. या पक्षाला आसामची सत्ताही दोनदा मिळाली होती. तथापि, नंतर आसाम गण परिषदेचा प्रभाव ओसरल्यानंतर सर्वानंद सोनोवाल यांनी भाजपमध्ये तर हेमंत बिस्वा शर्मा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शर्मा हे तरुण गोगोई यांच्या काँगेस सरकारमध्ये मंत्रीही होते. मात्र, नंतर त्यांचे काँगेसच्या श्रेष्ठींशी बिनसल्यामुळे त्यांनी 2015 मध्ये भाजपमध्ये प्रवेश घेतला. 2016 मध्ये भाजपच्या नेतृत्वात रालोआ सरकार आसाममध्ये निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे आरोग्य विभागासह अनेक महत्वाच्या विभागांचा भार सोपविण्यात आला. 2021 मध्ये पुन्हा रालोआचा विजय झाल्यानंतर आता त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे.









