प्रतिनिधी/ रत्नागिरी :
शहरातील कोरोनाबाधित चौघा रुग्णांपैकी राजीवडा येथील कोरोनाबाधित रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या रुग्णाची आणखी एकदा कोरोना चाचणी घेण्यात येईल. नजीकच्या साखरतर येथील 2 महिला आणि एका बालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे दिली.
मुंबईहून रत्नागिरीतील राजीवडा परिसरात आलेल्या 59 वर्षीय वृद्धाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला होता. त्यामुळे कोरोनाचा नवा रुग्ण आढळल्याने रत्नागिरीत खळबळ उडाली होती. 3 एप्रिल रोजी संबंधित व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. जिह्याचे ठिकाण असलेल्या रत्नागिरी शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने यंत्रणा अलर्ट झाली होती. त्यानंतर तत्काळ शहरातील राजीवडा भाग सील करून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती.
दरम्यान शनिवार 18 एप्रिल रोजी राजीवडा येथील कोरोनाबाधित रुग्णाचा दुसरा अहवाल जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे प्राप्त झाला. या अहवालानुसार, राजीवडा येथील तो रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. तरीदेखील आणखी एकदा या रुग्णाची कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे. हा अहवाल आल्यानंतर राजीवडा येथील जमावबंदीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान साखरतर येथील 2 महिला आणि एक 6 महिन्यांचा बालक या तिघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून या तिन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली.









