कॅमेराप्रेमीची किमयागारी : छायाचित्रकार रवी होंगल यांचा उपक्रम
बेळगाव / अक्षता नाईक
आवड असली की सवड मिळतेच आणि या आवडीमुळे अनेक संकल्पही प्रत्यक्ष साकारता येतात. हे शास्त्रीनगर येथील रहिवासी छायाचित्रकार रवी होंगल यांनी सिद्ध करून दाखविले आहे. केवळ छंद म्हणून त्यांनी फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला. पण इतके करून ते थांबले नाहीत तर त्यांनी चक्क कॅमेराटाईप बंगलाच बांधून घेतला. अपार कष्ट करून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपले स्वप्न सत्यात उतरविले आहे.

1986 दरम्यान बारावी झाल्यानंतर ते फोटोग्राफीच्या क्षेत्राकडे वळले. सुरुवातीला त्यांनी आऊटडोअर फोटोग्राफी केली. त्यानंतर स्वतःचा स्टुडिओ असावा म्हणून सिद्धार्थ नावाने फोटो स्टुडिओ सुरू केला व विवाहानंतर त्याच फोटो स्टुडिओचे नामकरण ‘राणी’ असे केले. लग्नानंतर त्यांच्या व्यवसायात भरभराट होत गेली. आपल्या पत्नीच्या साहाय्याने मी माझे स्वप्न पूर्ण करू शकलो, असे ते सांगतात.
आपण करत असलेल्या व्यवसायावर चांगली प्रगती साधली आहे. या व्यवसायाशी संबंधित आपले घर असावे, असा विचार मनात आला. त्यासाठी त्यांनी शास्त्रीनगर येथे जागा घेतली व 2018 साली घर बांधण्यास सुरुवात केली. आगळेवेगळे घर असावे यासाठी त्यांनी वेगवेगळय़ा चार अभियंत्यांशी संपर्क साधला. मात्र कोणालाही कॅमेराची डिझाईन असलेल्या घराचा मॅप काढता आला नाही. शेवटी त्यांनीच इंजिनिअरला नकाशा काढून दिला व आपले स्वप्नातले घर सत्यात उतरविले. असे असले तरी अपार कष्ट, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे साध्य करून दाखविले. फक्त बाहेरूनच घराला त्यांनी कॅमेऱयाचा आकार दिला नसून सेटिंग लोगो, फोटोग्राफी लोगो, प्सस्ट्राग आय लोगो, फोटोस सिम्बॉल अशा प्रकारच्या विविध लोगोंचा वापर घरातील इंटिरियर डिझाईनसाठी केला आहे. तसेच आपल्या घराचे नाव त्यांनी ‘क्लिक’ असे ठेवले आहे.
असा हा सुंदर कॅमेराचा बंगला आपल्या सर्वांना बेळगावच्या शास्त्रीनगर येथे पहावयास मिळणार आहे. विशेष म्हणजे बाहेरून येणारे जे छायाचित्रकार आहेत, त्यांच्यासाठीही त्यांनी स्वतंत्र खोलीची व्यवस्था केली आहे. छायाचित्रकार रवी होंगल यांच्या या आगळय़ावेगळय़ा आकर्षक घरामुळे छायाचित्रकारांमधून त्यांचे कौतुक होत आहे.
मुलांची नावे देखील कॅमेराचीच
स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद
छायाचित्रकार रवी होंगल यांनी आपल्या मुलांची नावेदेखील कॅमेरा कंपनीवरून ठेवली आहेत. ती म्हणजे कॅनॉन, निकॉन, ऍपसॉन अशी आहेत. जर त्यांना मुलगी झाली असती तर तीच नाव देखील कॅमेराच्यासंबंधितच ठेवणार होतो, असेही त्यांनी सांगितले. माझे घर कॅमेऱयासारखे असावे, असे मला सतत वाटत होते. गेल्या 10 वर्षांपूर्वी मी हे स्वप्न पहात आलो होतो. एक गुंठा जागेत या घराची रचना कॅमेऱयासारखी करून घेतली आहे. अजून घराचे थोडे काम बाकी आहे. पण माझे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद मला होत आहे, असे रवी होंगल यांनी सांगितले.
घर भेट दिल्याचा आनंदही
माझ्या पतीचे फोटोग्राफी, कॅमेऱयावर खूप प्रेम आहे. त्यांची आधीपासूनच इच्छा होती की, कॅमेऱयांची जी नावे आहेत, ती आपल्या मुलांचीही असावीत. म्हणून आम्ही आमच्या मुलांची नावेदेखील कॅमेऱयाशी संबंधित ठेवली आहेत. माझ्या पतीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तसेच त्यांनी मला हे घर भेट दिल्याचा आनंदही मला अधिक आहे.









