शनिवार- रविवारी कारखाने सुरू राहणार : गर्दी टाळण्याची सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यसरकारने नाईट कर्फ्यूसोबत विकेंड कर्फ्यू लागू केला आहे. परंतु या काळात उद्योग सुरू ठेवायचा की नाही? कामगारांना येण्याजाण्यासाठी परवानगी मिळेल की नाही? असे प्रश्न अनुत्तरित असल्याने उद्योजकांमध्ये शुक्रवारी गोंधळ होता. परंतु जिल्हा औद्योगिक केंद्र (डीआयसी) ने उद्योग सुरू ठेवण्याची मुभा असल्याचे जाहीर केल्याने हा गोंधळ कमी झाला. यामुळे शनिवारी तसेच रविवारी कारखाने सुरू ठेवले जाणार आहेत.
शुक्रवारी रात्री 9 पासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याकाळात संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे उद्योग सुरू ठेवायचे की बंद करायचे असा प्रश्न उद्योजकांसमोर होता. सीएनसी मशीन बंद केल्यास लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्मयता असल्याने योग्य तोडगा काढण्याची मागणी होत होती.
उद्योजकांनी आपल्या समस्या जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी दोड्डबसवराजू यांच्याकडे मांडल्या. यावेळी त्यांनी कारखाने सुरू ठेवण्याची परवानगी असल्याचे सांगितले. परंतु प्रत्येक कंपनीने कामगारांना ओळखपत्रे देणे जरूरीचे आहे. पोलिसांनी अडविल्यास ओळखपत्र दाखवावे लागेल. कारखान्यात एकाचवेळी गर्दी होणार नाही याची खबरदारी उद्योजकांनी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
सर्व उद्योग विकेंड कर्फ्यूच्या काळात सुरू राहणार
सरकारच्या नियमावलीनुसार जिल्हय़ातील सर्व उद्योग विकेंड कर्फ्यूच्या काळात सुरू ठेवले जाणार आहेत. कामगारांनी कंपनीचे ओळखपत्र आपल्याजवळ ठेवावे. तसेच काम संपल्यानंतर थेट घरी जावे, मास्क व सामाजिक अंतर राखण्याच्या सूचना कंपन्यांना करण्यात आल्याचे दोड्डबसवराजू यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.
–दोड्डबसवराजू (जिल्हा उद्योग अधिकारी)









