नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी मनपाने लढविली शक्कल, जनजागृतीसाठी उंटालाही घातले मास्क
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नियमावली लागू करून खबरदारीकरिता आवश्यक उपाययोजना राबविण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र नागरिक अद्यापही मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे जनजागृतीसाठी मनपाच्या अधिकाऱयांनी कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन चक्क उंटावरून करून नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
मास्क वापरणे, आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, सामाजिक अंतर राखावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने होत असून नागरिक कोरोना नियमावलीचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे जनजागृती करण्याबरोबर विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करण्यात येत आहे.
जनजागृतीसाठी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. स्वतः रस्त्यावर उतरले होते. प्रत्येक चौक, बाजारपेठेतील गर्दीच्या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱयांची नियुक्ती करून मास्क वापरण्याचे आणि सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच जनजागृतीसाठी शुक्रवारी महापालिकेने वेगळी शक्कल लढविली. चक्क उंटावर बसून मास्क वापरण्याचे व सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सदर जनजागृती फेरीची सुरूवात राणी चन्नम्मा चौकामधून करण्यात आली. याप्रसंगी महापालिका आयुक्त जगदीश के. एच यांच्याहस्ते जागृतीफेरीचा प्रारंभ करण्यात आला. राणी चन्नम्मा चौकामधून जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कचेरी रोड, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, रिसालदार गल्ली, काकतीवेसमार्गे राणी चन्नम्मा चौकात जागृतीफेरीची सांगता करण्यात आली. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते हणमंत कलादगी, पर्यावरण साहाय्यक अभियंते अदिलखान पठाण, प्रविण किल्लारी, अभियंत्या महादेवी तसेच स्वच्छता निरीक्षक, मुकादम आदीसह कर्मचारी जागृती फेरीत सहभागी झाले होते.









