पावसामुळे झाडाखाली आडोशाला थांबलेले असताना घडली दुर्घटना
प्रतिनिधी / बेळगाव
वीज कोसळून शुक्रवारी दुपारी दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. कणबर्गी रोडवरील सुरभी हॉटेलच्या पाठिमागील बाजूस ही घटना घडली. पावसामुळे झाडाखाली आडोशाला थांबलेल्या दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.
भरमाप्पा भीमाप्पा बहाद्दरवाडी (वय 39, रा. राजनकट्टी, ता. गोकाक), प्रकाश कऱयाप्पा व्यापारगी (वय 44, मूळचा रा. होगरती, सध्या रा. अक्कतंगेरहाळ, ता. गोकाक) अशी त्या दुर्दैवी कामगारांची नावे आहेत. अत्यवस्थ अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलला नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आहे.
माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांनी त्याची माहिती देण्यास टाळाटाळ केली. स्वतः पोलीस निरीक्षकांनीही पत्रकारांना टाळण्यात धन्यता मानली. त्यामुळे वीज कोसळल्याच्या घटनेनंतर काही संशयास्पद घडामोडी घडल्या आहेत का? असा संशय व्यक्त केला जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार सुरभी हॉटेलपासून हाकेच्या अंतरावर खासगी लेआऊटचे काम सुरू आहे. दुपारी 3.50 वाजण्याच्या सुमारास अचानक या परिसरात पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे भरमाप्पा भीमाप्पा बहाद्दरवाडी व प्रकाश कऱयाप्पा व्यापारगी हे दोघे एका झाडाखाली थांबले. अन्य कामगारही वेगवेगळय़ा झाडाखाली थांबले होते. त्याचवेळी वीज कोसळल्याने हे दोघे अत्यवस्थ झाले. तातडीने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.









